Nawab Malik: भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोपांचे तोफगोळे डागले. यानंतर आता मलिक यांनी त्या नेत्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या नेत्याचा प्रचार करणार नाही. मलिक यांना उमेदवारी देऊ नका, असं आम्ही अजित पवारांना स्पष्टपणे सांगितलं होतं, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही त्यांच्याच सुरात सूर मिसळला. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांनी तर मलिक यांचा उल्लेख थेट दहशतवादी असा केला. त्यांनी उमेदवारी देऊन अजित पवारांनी देशाचा विश्वासघात केल्याची टीका सोमय्यांनी केली. आता या नेत्यांच्या टिकेला मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्यावर आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार, मग तो कितीही मोठा नेता असू दे, असा आक्रमक पवित्रा मलिक यांनी घेतला आहे. ‘जे माझ्यावर दाऊदशी संबंध असल्याचे किंवा तशा प्रकारचे आरोप करत आहेत, त्यांच्याविरोधात कायदेशीर मार्गानं कारवाई करणार आहे. अशा प्रकारचा कोणताही खटला माझ्यावर नाही. दहशतवादाचा कोणताही खटला माझ्या विरोधात नाही. जे लोक या प्रकारचे आरोप करत आहेत, त्यांच्याविरोधात मी न्यायालयात धाव घेणार आहे. त्यांच्यावर मी बदनामीचा खटला दाखल करणार आहे. हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. कोणीही बोलत असेल, कितीही मोठा नेता असेल त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे,’ असा इशारा मलिक यांनी दिला आहे.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले होते. जे बोलणं योग्य नाही, ते विधान त्यांनी विधानसभेत केलं. बाहेर केलं असतं तर त्यांच्याही विरोधात मी कायदेशीर कारवाई केली असती. जे लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत, माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे,’ असा थेट इशारा मलिक यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपचे अनेक बडे नेते गोत्यात येण्याची शक्यता आहे.