Amit Thackeray: मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आचारसंहितेचे उल्लंघनाची तक्रार करण्यात आली आहे.
अमित ठाकरे यांनी माहीममधून अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने देखील या मतदारसंघात उमेदवार दिला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी देखील चर्चा सुरू झाली. आता या मतदारसंघात मनसेकडून शिवाजी पार्क येथील दीपोत्सवावरून शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. इतक नाही तर पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहले आहे.
परसनाईक यांनी या पत्रातून दीपोत्सवाचे आयोजन म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे सांगत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मनसेने पालिकेच्या सार्वजनिक स्थळावर दीपोत्सव साजरा केला आहे. या दीपोत्सवाच्या ठिकाणी मनसेने बॅनर, गेट आणि कंदिल लावल्याचे पत्रात म्हटले आहे. शिवाजी पार्कवर मनसेकडून दरवर्षी हा दीपोत्सव साजरा केला जातो.
या पत्रातून दीपोत्सवाचा खर्च हा अमित ठाकरे यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसचे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे म्हटले आहे. माहीम विधासनभा मतदारसंघात यावेळी तिहेरी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. आता ठाकरे गटाकडून आयोगाला या दिलेल्या पत्रानंतर अमित ठाकरेंवर काही कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.