Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha : भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. परंतु यामागे महायुतीची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असल्याची चर्चा आहे.
नवाब मलिक ठाम
नवाब मलिक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे त्यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाला होता. त्यामुळे त्यांना अणुशक्तीनगर मतदारसंघ सोडावा लागला. मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक यांना सोडला. परंतु, मलिक हे निवडणूकीतून माघार घेण्यास तयार नव्हते. मलिक हे सातत्याने शेजारचाच मतदारसंघ असलेल्या मानखुर्द शिवाजीनगरमधून लढण्यास आग्रही होते. त्यांचे मन वळविण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार स्वतः त्यांच्या कुर्ल्यातील घरी दाखल झाले होते. पण पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही आपण अपक्ष लढणारच, असा निर्धार मलिक यांनी बोलून दाखवला होता.
काय आहेत गणितं?
गेले सलग तीन टर्म्स मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी निवडून येत आहेत. या मतदारसंघात आता शिवसेनेच्या सुरेश उर्फ बुलेट पाटील यांनीसुद्धा अर्ज भरला आहे. आता महायुतीतील शिवसेना-भाजप समर्थक हे सुरेश पाटील यांचाच प्रचार आणि मतदान करणार, साहजिक. परिणामी नवाब मलिक विरुद्ध अबू आझमी या मुख्य सामन्यात मतं विभागली जाणार आणि फायदा महायुतीला होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरेश पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. किंवा नवाब मलिक विजयी झालेच, तरी युतीत राजकीय तडजोड करुन त्यांना सामावून घेतलं जाऊ शकतं. परंतु मलिक यांची निव्वळ ढाल करुन महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा विजयाचा मार्ग प्रशस्त केल्याची चर्चा आहे.
Nawab Malik : महायुतीची चाल, नवाब मलिक निव्वळ ढाल? आझमींचा गड खालसा करण्यासाठी ‘बुलेट’स्वारी
मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोणाची किती ताकद?
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अबू आझमी सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आझमींना ६९ हजार मतं मिळाली होती. तर शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरेंना ४३ हजार मतं पडली होती. २०१४ मध्ये आझमी विरुद्ध सुरेश पाटील असाच सामना झाला होता. त्यावेळी आझमींना ४१ हजार, पाटलांना ३१ हजार तर काँग्रेस उमेदवाराला २७ हजार मतं होती. समाजवादी पक्षाच्या अबू आझमींना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. मात्र मतविभाजनाचा फटका कुणाला बसतो का, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे.
दरम्यान, अर्ज माघारी घेण्याचा दिवस चार नोव्हेंबर आहे. त्या दिवशी दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होईल, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ‘नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. त्या आरोपात तथ्य नसल्याचं आमचं म्हणणं आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर न्यायव्यवस्था निर्णय देईल. त्यावेळी वस्तुस्थिती कळेल’ असंही दादा म्हणाले.