PM Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होणार आहेत. राज्यात ते सलग आठ दिवस सभा घेतील. याशिवाय, महायुतीच्या उमेदवारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील महाराष्ट्रात तंबू ठोकणार आहेत.
चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर कोण कोणाच्या विरोधात लढणार हे निश्चित होणार असून त्यानंतर लगेचच जाहीर प्रचाराचा नारळ फुटेल. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी बोलाविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होणार आहेत. राज्यात ते सलग आठ दिवस सभा घेतील. याशिवाय, महायुतीच्या उमेदवारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील महाराष्ट्रात तंबू ठोकणार आहेत. भाजपकडून शंभरहून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात सलग आठ दिवस प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर अमित शहांच्या एकूण वीस सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेतेही विधानसभेच्या प्रचारासाठी जोर लावणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही प्रचारसभांची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.
राहुल गांधी मुंबईत येणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सहा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून संध्याकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची गॅरंटी जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे हे उपस्थित राहाणार आहेत.
उद्धव यांच्या प्रचारसभा ५ नोव्हेंबरपासून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाच नोव्हेंबरपासून प्रचारसभा सुरू होणार आहेत. पाच नोव्हेंबरला त्यांची पहिलीच सभा रत्नागिरी येथे होणार असून १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच, ठाण्यात १६ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सभा घेऊन नागरिकांना संबोधित करतील. उद्धव ठाकरे यांच्या २० ते २५ जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.