Maharashtra Assembly Election 2024: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंसाठी भाजपने माघार घेतल्यानंतर मनसेनेही भाजपबाबत नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ठाकरे यांनी राज्यभर दौरे करीत २८८ ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. काही जागांवर उमेदवार घोषितही केले. त्यात नाशिक हा मनसेचा गड राहिल्याने नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम, इगतपुरी, देवळालीसह अनेक ठिकाणी उमेदवार दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार दिल्याने मनसैनिकांमध्ये जोश निर्माण झाला होता. परंतु, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंसाठी भाजपने माघार घेतल्यानंतर मनसेनेही भाजपबाबत नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.
नाशिक मध्य मतदारसंघात मनसेकडून जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार यांनी निवडणूक प्रचाराची तयारी सुरू केली असताना, आता त्यांना थेट माघारीचा निरोप आल्याची चर्चा आहे. या ठिकाणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे विरुद्ध गिते यांच्यात लढत होत आहे. मनसेच्या उमेदवारामुळे भाजपला दगा फटका होऊ नये यासाठी पवार यांना माघारीचा निरोप मिळाल्यानंतर मनसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू असताना वरिष्ठ नेत्यांनी मात्र चुप्पी साधल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पूर्वमध्ये सामाजिक दबाव?
नाशिक पूर्वमधून मनसेकडून प्रसाद सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु, सानप यांच्यावरही आता सामाजिक दबाव येत असल्याची चर्चा आहे. सानप यांची उमेदवारी येथे भाजपला पुरक आहे. परंतु, एका उमेदवारासाठी सानप यांनी माघारीसाठी प्रयत्न होत असल्यामुळे येथील मनसैनिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.