Chhagan Bhujbal On Sameer Bhujbal: यंदाची दिवाळी निवडणूक दिवाळी आहे. सर्वांच्याच घरी चार दिवस फक्त निवडणुकीवरच चर्चा सुरू असतील. पाच तारखेनंतर खरे राजकीय फटाके वाजतील, असे भुजबळ यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी गुरुवारी (दि. ३१) माध्यमांशी संवाद साधला. यंदाच्या दिवाळीत सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्या घरी ‘माघारी’ची चर्चा रंगली आहे. यंदाची दिवाळी निवडणूक दिवाळी आहे. सर्वांच्याच घरी चार दिवस फक्त निवडणुकीवरच चर्चा सुरू असतील. पाच तारखेनंतर खरे राजकीय फटाके वाजतील, असे भुजबळ यांनी सांगितले. नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, समीर भुजबळ जरी अपक्ष उमेदवारी करीत असेल, तरी कुटुंब म्हणून आम्ही शुक्रवारी (दि. १) लक्ष्मीपूजनासाठी एकत्र येणार आहोत. निवडणुकीत शिव्या आणि दादागिरी केली, तर कायदा आपलं काम करेल. नांदगावमध्ये जे घडलं ते समीर भुजबळ यांच्या फायद्याचेच असणार आहे, असा दावाही मंत्री भुजबळ यांनी केला.
यंदाची दिवाळी वेगळी
दिवाळीचा आनंद लहानपणी होता; तो आता नाही. ज्या चाळीत मी राहिलो तिथे आम्ही दिवाळीत वेगवेगळे पदार्थ बनवायचो. आम्ही एकमेकांना फटाक्यांची देवाणघेवाण करून फटाके वाजवायचो. दिवाळी अंकात आम्ही वेगवेगळे विषय वाचायचो. सार्वजनिक गणपतीसारखी सार्वजनिक दिवाळी आधी आम्ही साजरी करीत होतो, आता ती घरापुरतीच मर्यादित राहिली आहे. आता लहान-लहान मुलं फटाके फोडताना पाहूण खूप आनंद वाटतो. यंदाची दिवाळी फारच वेगळी आहे. निवडणुकीतील उमेदवारांना दिवाळीचा आनंद घेता येईल, असे मला वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीसाठीच दिवाळी गोड!
सध्या फक्त दिवाळीची औपचारिकता बाकी आहे. लहानपणी दिवाळीत नवीन कपडे आणि काहीतरी नवीन करण्याचा उत्साह होता, आता तसे होत नाही. यंदा निकाल लागत नाही तोपर्यंत सर्वांसाठी दिवाळी गोड आहे. निकालानंतर मात्र महायुतीसाठीच दिवाळी गोड असेल, असा दावाही त्यांनी केला.