Ratnagiri Crime Police Arrest Two: रत्नागिरीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका कारवर लक्ष ठेवलं आणि जेव्हा पोलिसांनी त्या कार चालकांकडे चौकशी केली तेव्हा कारमधून मोठं घबाड सापडलं.
रत्नागिरी शहरात पेट्रोलिंग सुरू असताना रात्री उशिरा मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे पोलिसांना ब्राऊन शुगर आणि गांजा सापडला आहे. त्याच्याकडे सुमारे ४ लाख, ४३ हजार, २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रत्नागिरी शहर पोलिसाच्या डी. बी. पथकाने तात्काळ दोघांना अटक केली आहे. यातील एक जण तडीपार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात खेड येथेही मोठी कारवाई करण्यात आली असून गांजा विक्री करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आलिशान कारसह एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खेड तालुक्यात नांदगाव येथे बुधवारी मध्यरात्री उशिरा संशयित दोघे मुस्तकिम जहांगिर कादीरी, आतीक राऊफ कादीरी ग्रे रंगाच्या इनोव्हामध्ये (एम. एच. ०५ सी. ए.२४३६) गांजाचा साठा घेऊन खास ग्राहकांना विक्री करीत असल्याची मोठी माहिती पोलिसांना मिळाली होती. याच अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास मौजे देवणे पुलावर संशयितांच्या हालचालीवर पोलिसांचं लक्ष होतं.
ग्रे रंगाचे टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडीतून हे दोघे खेड ते नांदगावच्या दिशेने येताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपली नावे मुस्तकिम जहांगिर कादीरी (वय २९ वर्षे) आतीक राऊफ कादीरी (वय ३०), (दोन्ही रा. नांदगाव मोहल्ला जवळ ता. खेड) सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडून एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेला नऊ हजार रुपये किमतीचा गांजा या मुद्देमाला बरोबरच आलिशान कार दोन अँड्रॉइड मोबाईल जप्त केला आहे.
Ratnagiri News: रात्रीस खेळ चाले; आलिशान कार, ते दोघे, सामसूम रस्ता अन् काळाकुट्ट अंधार, रत्नागिरीत नेमकं काय घडलं?
या दोन्ही संशयित आरोपींविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोकॉ. राहुल कोरे, प्रकाश पवार यांनी या घटनेचा तपास केला आहे.