Srijaya Chavan Net Worth : श्रीजया चव्हाण भोकरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शपथपत्रातून त्यांची कोट्यवधींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.
अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात
नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदार संघ आहेत. भोकर मतदारसंघ हा चव्हाण कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यंदा चव्हाण कुटुंबियाची तिसरी पिढी म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्या आपले भाग्य आजमावत आहेत.
श्रीजया चव्हाण यांचं शिक्षण बी.ए, एल.एल.बी पर्यंत पूर्ण झालं आहे. त्यांच्याकडे २० कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी शपथ पत्रात नमूद केलं आहे. त्यात ४ कोटी १७ लाख ८८ हजार ३७२ रुपये चल आणि १६ कोटी रुपये अचल संपत्तीचा समावेश आहे. शिवाय श्रीजया चव्हाण यांची अडाणी ग्रुपमध्ये गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे त्यांची नांदेड आणि मुंबई येथे बँक खाती आहेत. श्रीजयाकडे २५० ग्रॅम सोनं म्हणजेच १९ लक्ष ५७ हजार ५०० रुपयाचं सोनं आणि १० किलो चांदी म्हणजेच ९ लक्ष ८४ हजार रुपये किमतीचे दागिने नावावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
दुसरीकडे काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात पप्पू पाटील कोंडेकर यांना मैदानात उतरवलं आहे. पप्पू पाटील कोंडेकर काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांची संपत्ती देखील कोठ्यावधींच्या घरात आहे. १ कोटी ३० लाख ४४ हजार ३३२ रुपये हे चल, तर १ कोटी १० लाख ४७ हजार ७४६ एवढी अचल संपत्ती असल्याचं शपथ पत्रात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा आणि एका मुलीच्या नावे देखील लाखो रुपये असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही उमेदवार कोट्याधीश आहेत.
भोकर मतदार संघात सर्वाधिक १४० उमेदवार रिंगणात; १७ जणांनी घेतली माघार
राज्याचं लक्ष लागलेल्या भोकर मतदार संघात १४० उमेदवार पात्र ठरले आहेत. जिल्हातील नऊ मतदारसंघांपैकी भोकरमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत, तर सर्वाधिक कमी मुखेडमध्ये १७ उमेदवार मैदानात आहेत. शिवाय किनवटमध्ये २९, हदगाव ६३, नांदेड उत्तर ७३, नांदेड दक्षिण ५२, लोहा ३३, नायगाव २६, देगलूर २७ उमेदवार रिंगणात आहेत. येत्या ४ नोव्हेबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. आतापर्यंत १७ जणांनी माघार घेतली असून किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतील आणि हे पाहावं लागणार आहे.
भोकरमधून अर्ज भरणाऱ्या अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला
भाजपने भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना मैदानात उतरवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून पप्पू पाटील कोंडेकर उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेल्याने जनता नाराज झाली होती. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसला होता. भोकरमधून भाजपला अल्प प्रमाणात मतदान मिळालं होतं. आता आपल्या मुलीला निवडणून आणण्यासाठी अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जनता त्यांना कितपत साथ देणार हे पाहावं लागणार आहे.