Pune Crime : भररस्त्यात ‘घोडा’ काढला आणि बाईकस्वाराला दाखवला, बंदूक पाहून सगळेच हादरले, Video व्हायरल

Pune Crime Viral Video : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भर रस्त्यामध्ये एका तरूणाने बंदूक काढत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओने खळबळ उडाली असून पोलीस संबंधित तरूणाचा शोध घेत आहेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं असल्याचं दिसत आहे. पुण्यात रोज गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये बाहेर गावाहून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, मात्र कधी कोयता गँग तर टोळीयुद्धातून एकमेकांवर भरदिवसा एकमेकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यामध्ये गाडीवर बसलेला तरूण हातातील बंदूक दाखवत दहशत पसरवत आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील अपघातांमुळे कायम चर्चेत असलेल्या नवले ब्रिजच्या पुढे वारजेकडे जाताना लागणाया ब्रिजवर दोन तरूण मोटारसायकलवर चालले होते. त्यावेळी त्यातील मागे बसलेल्या तरूणाने हातात बंदूक काढत मागील गाडीवाल्यांवर उगारत त्यांनी भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एक चारचाकीमधील एकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलध्ये कैद केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलीस संबंधित तरूणाचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. पुण्यात भरदिवसा असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज यांची त्याच्याच सख्ख्या बहिणी आणि जावयांनी मिळून संपत्तीच्या वादातून सुपारी दिली होती. पुण्यातील नाना पेठ परिसरामध्ये रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. पुण्यात अनेक ठिकाणी रोज काहीना काही गुन्हेगारीच्या घटना घडतात, गावगुंड कोणाच्या आशीर्वादाने मोकाट फिरत आहेत का? असा सवाल अनेकवेळा उपस्थित केला जातो. त्यामुळेच या दीड-दमडीच्या गुडांना पोलिसांचा धाक राहिला नाही. पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने एखाद्याला खाकी पाहुणचार केल्यावर दुसऱ्या कोणाचीही गुन्हा करण्याची हिम्मत होणार नाही.

दरम्यान, पुण्यात या घटनांमुळे नागरिक कायम भीतीच्या सावटाखाली जगतात. कोण कधी कुठे गोळीबार किंवा कोणावर जीवघेणा हल्ला होईल काही सांगता येत नाही. कारण अनेकदा गोळीबाराच्या घटना घडतात, आताच गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Pune crimePune newspune young boy gun videoपुणेपुणे बातम्यापुणे मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment