Sharad Pawar vs Ajit Pawar: गेल्या पन्नास वर्षांपासून बारामतीमध्ये शरद पवार हे दिवाळी सणानिमित्त गोविंद बागेतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटतात. परंतु आता पवारांच्या घरातच फूट पडली आहे, पक्षही फुटला आहे. आता काय होणार? याची उत्सुकता होती, त्याचेही आता उत्तर मिळाले आहे.
काटेवाडीतील निवासस्थानी अजित पवार हे यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या कार्यक्रमात भेटीगाठी घेणार आहेत. तर येणाऱ्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. दुसरीकडे नेहमीप्रमाणे गोविंद बागेत शरद पवारांचा पाडवा होणार आहे. याठिकाणी शरद पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सध्याचे बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार आणि सर्व पवार कुटुंबीय राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतकांना भेटणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये देखील प्रश्न विचारला जात होता आणि कार्यकर्ते देखील संभ्रमात होते की, यंदा पवारांची दिवाळी एकत्र होणार का? गेल्यावर्षी अजित पवारांची भूमिका वेगळी झाल्यानंतर देखील अजित पवार दिवाळीनिमित्त गोविंदबागेत येऊन गेले होते. परंतु यावेळी काय होणार याची उत्सुकता आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अशा वेळी नेमकं काय होणार याची उत्सुकता होती. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी ५९ गावांचा दौरा सुरू करताना सांगितलं की, यावेळी मी काटेवाडीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार आहे. साहजिकच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दोन विठ्ठल बारामती तालुक्यात असणार आहे. एक गोविंद बागेत आणि एक काटेवाडीत!