Maharashtra Assembly Election 2024: मुंबईत मराठी मते जवळपास ४० टक्क्यांच्या आसपास असतानाही केवळ दोनच मराठी उमेदवार दिल्याने पक्षाला येत्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेले यश लक्षात घेता मुंबईत पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, यासाठी मुंबई काँग्रेस आग्रही होते. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला कमीत कमी १८ जागा मिळाव्यात, अशी इच्छाही मुंबई काँग्रेसमधील अनेक नेते मंडळींकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र अखिल भारतीय काँग्रेसने जाहीर केलेल्या आत्तापर्यंतच्या यादीत पक्षाने केवळ ११ जागांसाठीच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये कुलाबा (हिरा देवासी), मुंबादेवी (अमिन पटेल), धारावी (ज्योती गायकवाड), चांदिवली (नसीम खान), मालाड (अस्लम शेख), वांद्रे पूर्व (असिफ जकारिया), अंधेरी पश्चिम (अशोक जाधव), कांदिवली (काळू बुधेलिया), चारकोप (यशवंत सिंग), शीव-कोळीवाडा (गणेश यादव), मुलुंड (राकेश शेट्टी) यांचा समावेश आहे. या ११ उमेदवारांमध्ये केवळ दोनच मराठी उमेदवारांचा समावेश आहे. त्यात धारावीतून ज्योती गायकवाड आणि अंधेरी पश्चिम येथून अशोक जाधव रिंगणात उतरले आहेत. मुंबईत मराठी मते जवळपास ४० टक्क्यांच्या आसपास असतानाही केवळ दोनच मराठी उमेदवार दिल्याने पक्षाला येत्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे.
भांडुप, मुलुंड, गोरेगाव, दिंडोशी, चारकोप, शिवडी, वडाळा, माहीम, विक्रोळी मतदारसंघात मराठी मतांची संख्या इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक आहे. त्यात ११पैकी दोन जागांवर काँग्रेसकडून मराठी उमेदवार दिल्याने जातीय समीकरण काँग्रेसकडून साधण्यात का आले नाही, याबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
चार अल्पसंख्याक उमेदवार
राज्यात सध्या जातीय राजकारण पेटले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मुंबईतून मराठा समाजातून एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे त्याचाही फटका निवडणुकीदरम्यान बसू शकतो. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांनी महाविकास आघाडीला भरघोस मते दिली. ती मते लक्षात घेताच पक्षाकडून मुंबईत चार अल्पसंख्याक उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे, असे सांगितले जात आहे.