Amit Shetty on Varsha Gaikwad :ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीला पुन्हा तोंड फुटले आहे. रवी राजा हे गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज होते.
ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीला पुन्हा तोंड फुटले आहे. रवी राजा हे गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज होते. राजा यांना पक्षात डावलण्यात येत होते. पक्षातील अनेक बैठका आणि सभांना त्यांना आमंत्रित केले जात नव्हते. त्यातच पक्षाच्या कोणत्याही बॅनरमध्ये त्यांचा फोटो वापरू नये, अशी ताकीदच मुंबई काँग्रेस कार्यालयाकडून देण्यात आली होती, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाच्या आयोजित बैठकीलाही त्यांना आमंत्रित करण्यात येत नव्हते.
रवी राजा हे विधानसभा निवडणुकीसाठी सायन कोळीवाडा या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी अधिकृतरित्या पक्षाकडे अर्जही सादर केला होता. मात्र त्यांना उमेदवारी न देता गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या गणेश यादव यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे राजा यांची नाराजी अधिकच वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसकडून मुंबईच्या प्रश्नांवर पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनांमध्येही राजा यांना डावलण्यात आले होते. मुंबई काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वी मुंबईत न्याय यात्रा काढण्यात आली होती. तेव्हा देखील रवी राजा यांना विश्वासात न घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
दरम्यान, नाराज रवी राजा यांनी आपल्या नाराजीमागील कारणे दिल्लीश्वरांच्या कानावर घालण्यासाठी दिल्लीतील नेतेमंडळींची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या आठवड्याभरात रवी राजा तब्बल नऊ दिवस दिल्लीत ठाण मांडून बसून होते. पण त्यांना फक्त दहा मिनिटांची भेट के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. एकीकडे काँग्रेस अध्यक्षांकडून वर्षा गायकवाड यांना कोणताही निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळत असताना नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याचीही तसदी दिल्लीत कुणी घेत नाही. अशा परिस्थितीत या पक्षात आपले काहीच भवितव्य नाही, असे वाटल्यानेच त्यांनी उद्विग्नतेतून हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Ravi Raja : नऊ दिवस दिल्लीत, भेट दहा मिनिटांची, रवी राजांच्या पक्षांतराचं कारण काँग्रेस नेत्याने सांगितलं
बॅनरबाजीने वेधले होते लक्ष
रवी राजा नाराज असून ते लवकरच इतर पक्षात जातील, अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून सुरू होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी मतदारसंघात केलेली बॅनरबाजीमुळे त्याचे संकेत मिळाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रवी राजा यांच्या कोणत्याही बॅनरवर काँग्रेसच्या नेतेमंडळींचा फोटो नव्हता. त्यातच अनेक बॅनरमध्ये काँग्रेसच्या नावाचा उल्लेखदेखील नव्हता. त्यामुळे रवी राजा हे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा मतदारसंघात होती.
गायकवाडांवर कारवाईची मागणी
ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड जबाबदार असल्याची टीका पक्षाचे मुंबई सरचिटणीस अमित शेट्टी यांनी गुरुवारी केली. गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस पक्ष विकला असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून केला. त्यामुळे पक्षाला वाचवायचे असेल तर हायकंमाडने गायकवाड यांच्यावर कारवई करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.