Manoj Jarange MMD Equation: राज्यावर येणारे संकट संपवणार. हाच आपण विडा उचलला आहे. मतदारसंघ आणि उमेदवार यांची घोषणा येत्या ३ तारखेला करणार आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे स्पष्ट केले
‘आता आमचा कार्यक्रम जुळला. सगळ्या प्रश्नांवर समीकरण जुळले आहे. परिवर्तनासाठी लिंगायत, वारकरी आणि महानुभाव येणार आहेत. त्यांची दोन दिवस वाट बघू. आमचे काम ४ तारखेपासून सुरू होणार. उमेदवारी अर्ज ज्यांना मागे घ्यायला सांगितले, त्या सगळ्यांनी ते मागे घ्यायचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला खूप काही शिकवले आहे. आपण सत्ता परिवर्तन करणार,’ असा दावा त्यांनी केला. ‘जिथे मराठा उमेदवार उभे राहतील तिथे दलित मुस्लिम मराठ्यांना मतदान करणार, जिथे दलित उमेदवार आहे तिथे मराठा व मुस्लिम दलितांना मतदान करणार आणि जिथे मुस्लिम उमेदवार असेल तिथे मराठा आणि दलितांनी मतदान करावे. यासाठी आपण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेऊ,’ असे जरांगे म्हणाले.
‘महाराष्ट्रातील १४३ विधानसभा मतदारसंघांत मराठा किमान एक ते दीड लाख आहेत. त्यात दलित आणि मुस्लिम यांची बेरीज झाल्यानंतर फडणवीस काय करणार? मराठा समाजास आता आपण शक्ती मिळवून दिली असून, खऱ्या सुखाचे दिवस आले आहेत. कोणत्याही कामाची चिठ्ठी घेऊन या, लगेच काम करून टाकू,’ असेही ते म्हणाले.
नोमानींकडून जरांगेंचे कौतुक
‘मनोज जरांगे-पाटील यांच्यात आपण नवीन गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना अब्दुल कलाम यांचे रूप बघतोय,’ असे मौलाना सज्जाद नोमानी म्हणाले. ‘एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखेच निस्पृह जरांगे-पाटील आहेत, असे सांगून संघ आणि भाजपवर त्यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी फॅसिस्ट असल्याचे ते म्हणाले.
बंद दाराआड चर्चा
मौलाना सज्जाद नोमानी, राजरत्न आंबेडकर हे बारा वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटीत आले. मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. साडेबाराच्या सुमारास आनंदराज आंबेडकर आले. या सर्वांची बंद दाराआड दुपारी अडीच वाजेपर्यंत चर्चा झाली.