दिवाळीनंतर चढणार प्रचारज्वर; ४ नोव्हेंबरनंतर चित्र होणार स्पष्ट, सर्वपक्षीय नेत्यांच्या फौजा पुण्यात होणार दाखल

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. अर्ज मागे घेण्यासाठी चार नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे.

महाराष्ट्र टाइम्स
pracharr

म. टा. प्रतिनिधी, पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, अजून प्रचाराला रंगत आलेली नाही. सर्वत्र दिवाळीची धामधूम असल्याने राजकीय पक्षांनीही आपापल्या कार्यकत्यांना कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यास सांगितले आहे. दिवाळीचा आनंद लुटल्यानंतर मात्र, प्रचाराला गती येणार असून, सर्वपक्षीय नेत्यांच्या फौजा पुण्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर शहरातील प्रचाराला वेग येईल.

राज्याच्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. अर्ज मागे घेण्यासाठी चार नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या दिवाळी सुरू असून, तीन तारखेला भाऊबीजेने दिवाळीची सांगता होईल. त्यानंतर म्हणजे चार नोव्हेंबरपासून अठरा तारखेपर्यंत प्रचारासाठी १५ दिवसांचा अवधी मिळणार आहे. दिवाळी हा सर्वांत मोठा सण असल्याने सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद घेण्यास सांगितले आहे; तसेच नागरिकही दिवाळी साजरी करण्यात मग्न असून, सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यामुळे या कालावधीत प्रचार करून मतदारांना त्रास देणे योग्य नसल्याने सर्वांनीच दिवाळीची सुट्टी घेतल्याचे चित्र आहे.

सोमवारी हे चित्र बदलणार आहे. बंडखोरांची समजूत घालून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी सोमवार हाच अखेरचा दिवस आहे. त्यासाठी ऐन दिवाळीतही बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारचा दिवस अर्ज माघारीतच जाणार असून, मंगळवारनंतर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रचाराला सुरुवात होईल. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये केंद्रीय व राज्य पातळीवरील नेते, पदाधिकाऱ्यांच्या सभांचा समावेश आहे. विभागवार, समाजनिहाय मेळावे, दुचाकी फेरी, बैठका, रोड शो आदींच्या नियोजनावर अंतिम हात फिरवला जात आहे. याशिवाय उमेदवार प्रचारफेरी, पदयात्रा, छोट्या-मोठ्या बैठकांद्वारे प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर पुढील दोन आठवडे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

राजकीय फटाके दिवाळीनंतर
दिवाळी आणि फटाके हे समीकरण आहे. मात्र, प्रचारसभांना दिवाळीनंतर सुरुवात होणार आहे. या सभांमध्ये आरोप, प्रत्यारोप, चिखलफेक, टोमणे आदींची बरसात होणार आहे; तसेच काही ठिकाणी कार्यकर्तेही ‘फोडले’ जाणार असून, त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय फटाके फुटणार आहेत.
काँग्रेसचे दोनच मराठी उमेदवार; मुंबईत ११ जागांमध्ये टक्का कमीच, फटका बसण्याची शक्यता
फ्लेक्स, किट्स आणि मेसेज
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांनी आपापल्या हद्दीत दिवाळी किट्सचे (फराळ, धान्य, उटणी, सुगंधी तेल) वाटप केले. फ्लेक्स लावून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; तसेच ‘एसएमएस’ आणि रेकॉर्डेड कॉलद्वारे मतदारांना शुभेच्छाही दिल्या. याद्वारे काहींनी प्रचारात आघाडी घेतली आहे. रेकॉर्डेड कॉलद्वारे नेत्यांनी शुभेच्छा दिल्याने अनेक कार्यकर्ते मात्र खुश दिसत होते. आता दिवाळीनंतर थेट प्रचारावर भर दिला जाणार आहे.
दिल्ली झाकोळली! फटाक्यांच्या आतषबाजीने हवेचा दर्जा ‘अत्यंत खराब’, ३ वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित दिवाळीची नोंद
दिवाळी पहाट आणि फराळाला जोर

मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम आणि ‘दिवाळी फराळ’ उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. उमेदवारांऐवजी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, उमेदवार जातीने या कार्यक्रमाला हजेरी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी साधत आहेत. काही वेळा तर दिवाळी पहाट आणि फराळांच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

diwali 2024election campaigningmaharashtra assembly electionsmaharashtra electionsपुणे बातम्यामराठी बातम्याविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment