Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंचन घोटाळा प्रकरणात केलेल्या विधानामुळे भाजप अडचणीत आले आहेत. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
सिंचन घोटाळा प्रकरणावर बोलताना अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना लक्ष्य केलं. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्याच्या फाईलवर आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. पण त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी मला एकदा भेटायला बोलावलं. तेव्हा त्यांनी चौकशीच्या फाईलवरील आबा पाटील यांची सही दाखवली. हा केसाचा गळा कापण्याचा प्रकार असल्याचं अजित पवार म्हणाले होते.
अजित पवारांनी सांगितलेला किस्सा आता महायुती सरकारसाठी विशेषत: भाजपसाठी अडचणीचा ठरत आहे. यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजपला थेट लक्ष्य केलं आहे. ‘२०१४ च्या आधी विरोधात असताना भाजपनं अजित पवारांवर मोठ्य प्रमाणात सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा दावा केला होता. त्यावेळी नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी या आरोपांचं नेतृत्त्व केलं होतं. त्यांनी एनसीपीला नॅशनल करप्ट पार्टी म्हटलेलं होतं,’ याची आठवण रमेश यांनी करुन दिली आहे.
रमेश यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही रडारवर घेतलं आहे. ‘मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवलेली होती, असा गौप्यस्फोट आता अजित पवारांनीच केला आहे. यातून भाजपनं अजित पवारांना एक स्पष्ट संदेश दिला होता, आमच्यापुढे समर्पण करा किंवा मग कारवाईचा सामना करा,’ अशा शब्दांत जयराम रमेश यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कारण यातून ना केवळ जबरदस्ती आणि ब्लॅकमेलिंग आहे, पण यातून गोपनीयतेच्या शपथेचाही भंग झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी रमेश यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्याच काही खासदारांनी ४०० पार का नार देत संविधान बदलाची भाषा केली होती. त्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला. भाजपच्या जागा घटल्या. त्यानंतर फडणवीसांनी फेक नरेटिव्ह शब्द वापरला होता. पण आता सरकारमध्येच असलेल्या अजित पवारांनी विरोधकांना नरेटिव्ह सेट करण्याची आयती संधी दिली आहे.