Sharad Pawar Maharashtra Economical Status: राष्ट्रीय पातळीवरील सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा दोन टक्क्यांनी घटला आहे. यामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री नेहमीच राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे भाष्य करत असतात. यावरुन मात्र शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
शनिवारी गोविंद बागेतील मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांनी पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाबाबत भाष्य केले आहे. अहवालानुसार देशाच्या आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची कामगिरी कमी पडल्याचे दिसून येते. यावर शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल. सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही नवीन योजनांसाठी गरीबांसाठी असणाऱ्या योजनांचा निधी वळविला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गरीबांच्या पदरात काहीही पडलेले नाही.
मला महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळायला सध्याच्या राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकार अर्थखात्याशी संबंधित एका विभागाने देशातील राज्यांच्या आर्थिक कामगिरीचे रँकिंग जाहीर केले आहे. जे राज्य एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होते, ते पहिल्या पाचमध्ये नाही. याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही महाराष्ट्रासाठी धक्कादायक परिस्थिती आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अर्थव्यवस्था मजबूत करायला जी काही पावल टाकली पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुसतं राजकारण करुन प्रश्न सुटत नाहीत. तर सध्या परिस्थिती किती गंभीर आहे, हे याकडे लक्ष दिले पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
यावरुन शरद पवारांनी सत्ता परिवर्तनाचा मुद्दा पुन्हा पुढे आणला आहे. ते म्हणाले, या समस्येतून मार्ग काढायचा असेल तर सत्तेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही, राज्यात बदल व्हायलाच हवा. ‘ज्यांच्यात बदल घडवायची ताकद असेल, त्यांना जनतेने सत्तेत आणले पाहिजे. आपण सामूहिक प्रयत्नाने परिवर्तन आणू शकतो, हाच निर्धार पाडव्याच्या दिवशी करावा,’ असेही शरद पवार म्हणाले आहेत.