Maharashtra Election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे, अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा लढतींकडे लक्ष लागलं आहे. पण या लढतींशिवाय ७५ मुकाबले सर्वात रंजक आणि निवडणुकीचा निकाल ठरवणारे आहेत.
गेल्या अडीच वर्षांत दोन प्रादेशिक पक्ष फुटले. त्यांची शकलं झाली. पण भाजप आणि काँग्रेसला तशी घरघर लागलेली नाही. दोन्ही पक्षात यंदा ७५ जागांवर लढत होत आहे. या लढतींचा निकाल निवडणुकींचा निकाल ठरवणारा असेल. कारण गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष ६६ जागांवर आमनेसामने होते. तेव्हा काँग्रेसला केवळ १६ जागांवर यश मिळालेलं होतं. तर भाजपनं ५० जागांवर झेंडा फडकवला होता. यातील तब्बल २३ जागा एकट्या विदर्भातील होत्या. त्यामुळेच भाजपला १०५ जागांपर्यंत मजल मारता आली.
यंदा भाजप विदर्भात ४७, पश्चिम महाराष्ट्रात ३२, उत्तर महाराष्ट्रात १७, मराठवाड्यात १९, मुंबईसह कोकण पट्ट्यात १९ जागा लढवत आहे. विदर्भात यंदाही काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळेल. गेल्यावेळी या संघर्षात ३१ पैकी २३ जागा भाजपच्या, तर केवळ ८ जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या होत्या. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेत काँग्रेसचे ५, तर भाजपचे केवळ २ उमेदवार जिंकले आहेत. त्यामुळे विधानसभेला काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
मुंबईत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना १२ जागांवर झाला. त्यातील केवळ २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. उत्तर महाराष्ट्रात ६ जागांवर काँग्रेस, भाजप असा मुकाबला झाला. त्यातील फक्त २ जागांवर काँग्रेसला यश मिळालं. मराठवाड्यात १० जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. त्यातील केवळ ३ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. पश्चिम महाराष्ट्रात ६ जागांवर काँग्रेस, भाजपमध्ये लढत झाली. त्यातील केवळ २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या.
गेल्या विधानसभेला भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं अव्वल क्रमांक मिळवला. तर भाजप थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. भाजप आणि काँग्रेस अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडीतील मोठे भाऊ आहेत. ते सर्वाधिक जागा लढत असल्यानं त्यांनी जिंकलेल्या जागांमुळे निवडणूक निकालासोबतच मुख्यमंत्रिपदाच्या मुद्दाचाही निकाल लागू शकतो.