Wardha Arvi Vidhan Sabha Dadarao Keche : वर्ध्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून बंडखोर आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी अर्ज मागे घेतला असून भाजपच्या वरिष्ठांना त्यांची समजूत काढण्यात यश आलं आहे.
भाजपने उमेदवारी नाकारली, दादाराव केचे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
आर्वी मतदारसंघात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या सुमित वानखेडे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र भाजपने सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी अपक्ष लढणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी अपक्ष अर्जही दाखल केला.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढली जात होती
मात्र त्यानंतर पक्षाकडून केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यांसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. नंतर केचे वर्ध्यातून गायब झाले. ते दिल्लीत गेल्याचं बोललं जात होतं, मात्र त्यांनी ते अहमदाबादला गेल्याचं सांगितलं. आपल्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे असल्याचंही ते म्हणाले. अहमदाबादमध्ये केचे यांची अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढली जात होती.
अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला
भाजपकडून तिकीट कापण्यात आलेले वर्धा आर्वीचे बंडखोर आमदार दादाराव केचे यांनी अखेर भाजपच्या सुमित वानखेडे यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
Wardha News : वर्ध्यात बंडखोर आमदार दादाराव केचे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे, अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर समेट
दादाराव केचे हे वर्ध्यातील आर्वीचे आमदार आहेत. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अहमदाबादमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी अर्ज मागे घेत असल्याचं सांगितलं. कार्यकर्ता कार्यकर्त्यापासून दूर जाऊ नये, यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची प्रतिक्रिया केचे यांनी दिली आहे.