Mumbadevi Assembly constituency: मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमीन पटेल आणि महायुतीच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्यात थेट लढत आहे.
शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसल्याने पटेल यांना विजय सहज मिळवता येत होता. मात्र यावेळी स्वतःकडे उमेदवार नसल्याने भाजपच्या शायना एन. सी. यांना पक्षात प्रवेश देऊन पटेल यांच्यासमोर त्यांचे आव्हान उभे करण्यात आले आहे. येथील मतदार बाहेरून आणलेल्या उमेदवाराला निवडून देतात की, पुन्हा एकदा स्थानिक नेत्याच्या गळ्यात विजयी माळ घालतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
भाजपचे राज पुरोहित २००४पर्यंत या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले होते. त्यानंतर गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसने येथे यश मिळवले आहे. मुंबादेवी मतदारसंघात भेंडी बाजार, नळ बाजार, चोर बाजार, मोहम्मद अली मार्ग, नाखुदा मोहल्ला, डोंगरी, नागपाड्याचा काही भाग या ठिकाणी मुस्लिम लोकवस्ती मोठ्या संख्येने आहे. त्याखालोखाल गुजराती, मारवाडी, जैन समाजाची लोकसंख्या या मतदारसंघात आहे. सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर, दुसरी, तिसरी सुतार गल्ली या परिसरात गुजराती, जैन समाज राहतो. कुंभारवाडा, खेतवाडी, सुतारगल्ली या भागात मराठी मतदार तुलनेत अधिक आहेत. मुस्लिम भागामध्ये अमीन पटेल यांच्या जनसंपर्क चांगला आहे. घराघरांमध्ये परिचयातील चेहरा म्हणून पटेल हे या ठिकाणी ओळखले जातात.
तीन निवडणुकांमध्ये त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता त्यांच्यासमोर या मतदारसंघात तितक्याच तगडा उमेदवाराच्या शोधात महायुती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या भागात फारसा प्रभाव नाही. त्याचप्रमाणे तितका तोडीचा उमेदवारही या ठिकाणी त्यांच्याकडे नसल्याने शायना एन. सी. यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. शायना परिचयातील चेहरा असून त्या मुंबईचे माजी महापौर आणि शेरीफ राहिलेल्या नाना चुडासामा यांच्या कन्या आहेत. फॅशन डिझायनर असलेल्या शायना अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी डोंगरी, उमरखाडी, कुंभारवाडा, भुलेश्वर, खेतवाडी यांसारख्या मराठी, गुजराती मतदार असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपची साथ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते.
लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांच्या विजयामध्ये मुस्लिम मते निर्णायक ठरली. मुस्लिम धर्मीयांचे प्राबल्य असलेल्या मुंबादेवी मतदारसंघात मतदानादिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याचा परिणाम निकालामध्ये दिसून आला. मुंबादेवीमध्ये यामिनी जाधव यांना ३६,६९० मते मिळाली, तर अरविंद सावंत यांनी ७७,४६९ मते मिळवली. आमदार अमीन पटेल यांनी प्रचारादरम्यान तसेच मतदानादिवशी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तीच मेहनत आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना अमीन पटेल यांना विजयी करण्यासाठी करताना दिसत आहे.
कोंडलेला मतदारसंघ
मोडकळीस आलेल्या इमारती, दाटीवाटीने वसलेली घरे, वाहतूककोंडी आणि नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा हे या मतदारसंघातील सध्याचे चित्र आहे. शंभर, सव्वाशे वर्षे जुन्या छोट्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रश्न रखडले आहेत. अनेक भागांत बेकायदा धंद्यांमुळे फूटपाथ व्यापले असून या ठिकाणी चालणेही कठीण झाले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जोडण्या जीर्ण आहेत. पाणीचोरीची मोठी समस्या आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार अनेकदा रहिवासी करतात.
एकूण मतदारसंख्या : २,४१,२४१
पुरुष मतदार : १,२९,३०७
महिला मतदार : १,११,९२५