Thane Political News: आता ही माहिती खरी ठरली असून मित्र म्हणून ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात जाहीर केले.
हायलाइट्स:
- ठाकरे गटाच्या उमेदवाराला मनसेचा पाठींबा?
- अंबरनाथमधील राजकीय चित्र बदलणार?
- विश्वनिय सूत्रांची मटा ऑनलाईला माहिती
अंबरनाथमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला आज मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते. याचवेळी अंबरनाथमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे हे देखील याच कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात वानखेडे आणि राजू पाटील यांनी स्टेजवरच एकमेकांची गळाभेट घेतली, तसंच या दोघांमध्ये स्टेजवर चर्चा देखील झाली. यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांना वानखेडे यांना मदत करणार का? असा प्रश्न विचारला असता, “राजेश वानखेडे हे माझे मित्र आहेत. त्यात अंबरनाथमध्ये मनसेचा उमेदवारही नाही. त्यामुळे मित्र म्हणून राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार”, अशी भूमिका राजू पाटील यांनी जाहीर केली. तर याबाबत ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना विचारलं असता “सर्व मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील याची मला खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून महायुती आणि महाविकास आघाडीत खळबळ माजण्याशी शक्यता आहे.