PM Modi Rally in Mumbai: महायुतीतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरणार आहे. यातच चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या माहिम मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार आहे.
राजपूत्र अमित ठाकरेंच्या मतदारसंघात भाजप नेत्यांनी फिल्डींग लावलेली पाहायला मिळत आहे. तर तिकडे शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांवर देखील दबाव वाढत चालल्याचे चित्र आहे. यातच १४ नोव्हेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र प्रमुख उपस्थितीत महायुतीची सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंचे होमग्राउंड असणाऱ्या याच मैदानातून ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. यातच भाजपच्या नेत्यांनीही राजपूत्र अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची उघड भूमिका घेतल्याने पंतप्रधान मोदी नेमके कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान महायुतीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सलग ८ दिवस महाराष्ट्रात तळ ठोकणार आहेत. राज्यातील प्रमुख मतदारसंघात ते प्रचार सभांना उपस्थिती लावणार आहेत. अशातच मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानातही त्यांची जंगी सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यानही नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कात नरेंद्र मोदींची तोफ धडाडली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबतच मनसेप्रमुख राज ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींसमोर विविध मागण्या करुन एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. तर याची परतफेड म्हणून नरेंद्र मोदी कोणती भूमिका घेणार हा मुद्दा कळीचा ठरणार आहे.
राहुल नार्वेकर म्हणतात…
देशातील लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. आता जे पोषक वातावरण आहे युतीसाठी दिसत आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींची सभा मोठं आकर्षण ठरणार आहे. नरेंद्र मोदींची ही सभा मुंबईतील मतदारसंघ आणि महायुतीसाठी होत आहे, फक्त माहीम या एकाच मतदारसंघासाठी नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.