Manoj Jarange Patil Candidates in Parbhani: मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले आहे.
परभणी जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये परभणी, जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघाविषयी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघात जरांगेंचे उमेदवार
परभणीचा पाथरी विधानसभा मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. यामुळे मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारास पोषक वातावरण दिसत आहे. याचा विचार करता मनोज जरांगे पाटील यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाथरी विधानसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांच्याकडून निडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा देखील समावेश आहे. आता यांच्यापैकी कोणाला जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी घोषित होते, हे पाहावे लागणार आहे.
गंगाखेड, जिंतूर मतदारसंघात आमदारांना पाडण्याचा डाव
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे सध्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सध्या नेतृत्व करत आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याविषयी विरोध दर्शविला होता. त्याचबरोबर त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा दिला होता. आमदार रत्नाकर गुट्टे यांची भूमिका मराठा आरक्षणविरोधी असल्याने मतदारसंघातील मराठा बांधव त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रत्नाकर गुट्टे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.
जरांगे पाटलांनी परभणीत पत्ते टाकले; कोण ठरणार शिलेदार? कुणाचा होणार गेम ओव्हर? महायुतीत तणाव!
जिंतूर विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर कार्यरत होत्या. मेघना बोर्डीकर या भाजपच्या आमदार असल्याने त्यांनी मराठा आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका घेतली नाही. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात मेघना बोर्डीकर यांनी पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील मेळाव्याला देखील हजेरी लावली. पण मनोज जणांच पाटील यांच्या नारायण गडावरील मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यामुळेच मराठा समाजामध्ये मेघना बोर्डीकर यांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे. मेघना बोर्डीकर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात आणि त्याचाच फटका आता त्यांना या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात त्याचा परिणाम जाणवणार आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनाला मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाने पाठिंबा दिला तर चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसू शकतो. तर आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर ओबीसी समाज काय निर्णय घेईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एक मात्र निश्चित लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी असा जो सामना रंगला होता तसाच सामना विधानसभा निवडणुकीतही रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.