Manoj Jarange Patil: विधानसभा निवडणुकीत मराठा समाज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आंदोलक मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण ४६ जागा येतात. त्यातील मराठा मतदार जास्त असलेल्या जागांबद्दल जरांगे पाटील यांनी निर्णय घेतलेले आहेत. काही जागांवर जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत. कुठे उमेदवार पाडायचे आणि कुठे पाठिंबा द्यायचा, याबद्दलचा निर्णयदेखील झालेला आहे. त्याबद्दलची घोषणा संध्याकाळी पाच वाजता करण्यात येईल. राखीव मतदारसंघांबद्दलचा निर्णय १० नोव्हेंबरनंतर घेण्यात येईल.
परतूर, फुलंब्री, बीड, केज, हिंगोली, पाथरी, कन्नड, हदगाव मतदारसंघांमध्ये जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत. भोकरदन, गंगापूर, कळमनुरी, गंगाखेड, जिंतूर, औसा या मतदारसंघात कोणाला पाडायचं, याचा निर्णय जरांगे पाटील घेणार आहेत. तर बदनापूर, छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये जरांगे पाठिंबा देणार आहेत.
Manoj Jarange Patil: कुठे लढायचं, कुठे पाडायचं, कुठे पाठिंबा द्यायचा? जरांगेंचं ठरलं, मतदारसंघांची यादी समोर
जरांगे पाटील यांनी सध्या तरी केवळ मराठवाड्यातील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राबद्दल अद्याप त्यांची कोणतीही चर्चा झालेली नाही. मराठाबहुल मतदारसंघांमध्ये काय भूमिका घ्यायची याचे निर्णय जरांगे घेत आहेत. कुठे उमेदवार द्यायचा, कुठे पाठिंबा द्यायचा आणि कुठे पाठिंबा द्यायचा, याची वर्गवारी केली जात आहे. जिथे उमेदवार निवडून यायची खात्री असेल तिथेच उमेदवार द्यायचा अशी त्यांची भूमिका आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा फॅक्टर महागात पडला. मराठवाड्यातील आठपैकी केवळ एक जागा महायुतीच्या पदरात पडली. मराठा मतदारांचा रोष महायुतीला सहन करावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला. २०१९ मध्ये सेना-भाजप युतीनं मराठवाड्यात ८ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ४ जागांवर भाजपनं विजय साकारला. यंदा भाजपला भोपळाही फोडता आला नाही.