माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झालं आहे. गेल्या चार आठवड्यांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती.
१७ सप्टेंबरच्या सकाळी समीर खान, त्यांची पत्नी निलोफरसह क्रिटी केअर रुग्णालयात नियमित तपासणीसाठी गेले होते. निलोफर या नवाब मलिर यांच्या थोरल्या कन्या आहेत. रुग्णालयातून निघाल्यानंतर निलोफर आणि समीर खान कारची वाट पाहत थांबले होते. तेव्हा त्यांच्या कार चालकानं अचानक ऍक्सिलेटर दाबला. त्यामुळे कारनं वेग पकडला. ती सुसाट वेगात पुढे गेली आणि भिंतीला जाऊन धडकली. समीर खान कारसोबत फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
१७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता कारला अपघात झाला. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मेंदूत गाठ झाली होती. याशिवाय बरगडी, खांदा, मानेला फ्रॅक्चर झालं होतं. कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात होते. ते आयसीयूमध्ये होते. त्यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल समजताच नवाब मलिक तातडीनं रुग्णालयाच्या दिशेनं निघाले.
या प्रकरणात पोलिसांनी कारचा चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारीला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. या अपघातात फुटपाथवर उभ्या असलेल्या तीन दुचाकींचं मोठं नुकसान झालं. कुर्ला पश्चिमेत हा अपघात झाला होता. अपघात झाल्यापासूनच समीर खान यांचे जावई समीर खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती.