विधानसभा निवडणुकीसाठी भरण्यात आलेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्या सगळ्याच मतदारसंघांतील लढतींचं चित्र स्पष्ट होईल.
काँग्रेस उमेदवारांसह मित्रपक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरी करणाऱ्या बहुतांश नेत्यांची मनधरणी करण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना यश आलं आहे. बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणारे बहुतांश जण उद्या अर्ज माघारी घेणार असल्याचं कळतं. त्यामुळे काँग्रेससह, ठाकरेसेना आणि शरद पवार गटाला दिलासा मिळणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीची कामगिरी सरस झाली असल्यानं इच्छुकांची संख्या वाढली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली.
बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. ते यशस्वी ठरले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून काँग्रेसच्या वॉर रुममधून बंडखोरी रोखण्यासाठी फोनाफोनी सुरु होती. त्यात आठ नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, नसीम खान, खासदार डॉ. नासीर हुसेन, टी. एच सिंहदेव यांनी बंडखोरांशी संवाद साधत त्यांची समजूत काढली.
काँग्रेस आणि ठाकरेसेनेत जागावाटपावेळी बराच वाद उफाळून आला. विशेषत: विदर्भातील काही जागांवरुन बरीच तणातणी झाली. काही जागा ठाकरेसेनेनं हट्टानं मागून घेतल्या. त्यामुळे तिथे स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मुंबईतील काही जागांवरही बंडखोरी झाली. भायखळा, मुलुंड या जागा ठाकरेसेनेला सुटल्या. या जागांसाठी काँग्रेस आग्रही होती. सांगलीतही बंडखोरी झाली. यातील बहुतांश बंडखोरांना शांत करण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांना यश आलं आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक १०२ जागा लढवत आहे. तर ठाकरेसेना ९६, शरद पवारांचा पक्ष ८६ जागांवर लढत आहेत. समाजवादी पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांना प्रत्येकी २ जागा सोडण्यात आल्या आहेत.