Hingoli Kalamnuri Vidhan Sabha: आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आणि कोणत्या मतदारसंघात प्रस्थापितांचे उमेदवार पाडायचे हे स्पष्ट केले आहे. यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी कळमनुरी मतदारसंघात उमेदवार पाडणार असल्याची भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे जरांगे फॅक्टर काम करुन गेल्याने जरांगे आता प्रत्यक्षपणे राजकीय आखाड्यात मराठा शिलेदार उतरवणार आहेत. मराठवाड्यातील मराठा मतटक्का जास्त असलेल्या मतदारसंघांत उमेदवार देण्याचे जरांगेंनी ठरवले आहे. तर अन्य काही मतदारसंघांत त्यांनी उमेदवार पाडायचे ठरवले आहे. यामध्येच कळमनुरी मतदारसंघातून विद्यमान आमदाराला घरी पाठव्याचे ठरवताच आमदार संतोष बांगर यांचे समर्थक मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आंतरवाली सराटीच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत. जवळपास १०० गाड्या घेऊन बांगर यांचे समर्थक रवाना होणार आहेत. जरांगे यांना भेटून कळमनुरी मतदारसंघाबद्दलचा त्यांचा निर्णय बदलावा, अशी विनंती करणार असल्याचे समजत आहे.
जरांगे पाटलांनी सध्या तरी केवळ मराठवाड्यातील मराठाबहुल मतदारसंघांवर लक्षकेंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. इतर विभागातील मतदारसंघांबाबत अद्याप चर्चा सुरु असून त्याचाही निर्णय ते लवकरच जाहीर करणार असल्याचे समजते. जालना जिल्ह्यातील परतूर, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री, बीड जिल्ह्यातील बीड, केज तर हिंगोलीतील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि नांदेडातील हदगाव येथे जरांगे मराठा शिलेदार रिंगणात उतरवणार आहेत.
तर जालन्यातली भोकरदन, छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर, हिंगोलीतील कळमनुरी, परभणीतील गंगाखेड आणि जिंतूर, लातूरमधील औसा या मतदारसंघांत उमेदवारांना पाडायचे जरांगेंनी ठाणले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगें फॅक्टर महायुतीला महाग पडला होता. आताही जरांगेंनी सत्ताधारीविरोधी भूमिका घेतल्याने राजकीय आखाड्यातील प्रस्थापितांचे टेन्शन वाढणार आहे. यातच कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांनी जरांगेंच्या निर्णयाचा धसका घेतलेला दिसत आहे. यासाठीच बांगर समर्थक जरांगेंची समजूत काढणार असल्याचे समजत आहे.