BJP Maharashtra: भाजपनं तीन मतदारसंघांमध्ये घेतलेल्या तीन भूमिकांमुळे मित्रपक्षांची अडचण झाली आहे. भाजपच्या भूमिकेमुळे शिंदेसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार अडचणीत आले आहेत.
माहीम, सिल्लोड, मानखुर्द मतदारसंघांमध्ये भाजपनं वेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. माहीममधून शिंदेसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत. इथूनच मनसे प्रमुख राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेदेखील निवडणूक लढत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून शिंदेंनी सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. पण सरवणकर माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे भाजपनं या मतदारसंघात अमित ठाकरेंचा प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा फटका सरवणकर यांना बसू शकतो. माहीम मतदारसंघात भाजपची ३० ते ३५ हजार मतं आहेत.
सिल्लोडमध्ये शिंदेसेनेकडून अब्दुल सत्तार यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. ते २००९ पासून सलग तीनदा विजयी झाले आहेत. अब्दुल सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातला वाद सर्वश्रृत आहे. सत्तार यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका दानवेंनी घेतली आहे. ‘मी भाजपचा संस्थापक सदस्य आहे. मी सिल्लोडमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. भाजपचा निवडणूक प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दौरे, सभा आयोजित करण्याची जबाबदारी माझी आहे. पक्षानं जर सांगितलं तरच मी सिल्लोडला जाईन,’ असा पवित्रा दानवेंनी घेतला आहे. त्यामुळे सत्तारांचं टेन्शन वाढलं आहे.
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीनं नवाब मलिक यांना संधी दिली आहे. मलिक यांच्यावर भाजपच्याच नेत्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे मलिक यांच्या उमेदवारीस भाजप नेत्यांचा विरोध होता. पण तरीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मलिक यांना तिकीट दिलं. त्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत मलिक यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. तिथे शिवसेनेचे सुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत. भाजप पाटील यांचा प्रचार करणार आहे.