NCP Sharad Pawar Challenges in Baramati: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसला आहे. मातब्बर पदाधिकाऱ्याने अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला इंदापूर तालुक्यातील आप्पासाहेब जगदाळेंसह अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. तशी नाराजी ही ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे व्यक्त केली होती. मात्र शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज जेष्ठ नेते शरद पवारांनी इंदापूर तालुक्याचा दौरा केला. पवारांचा दौरा संपताच पत्रकार परिषद घेत जगदाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. जगदाळे लवकरच मेळाव्याचे आयोजन करणार असून या मेळाव्यात त्यांच्या समर्थकांना महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इंदापुरातील शरद पवारांचा दौरा होताच आप्पासाहेब जगदाळेंनी भूमिका जाहीर केली. नाराज असलेल्या आप्पासाहेब जगदाळेंचा आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून जगदाळे यांच्यासह इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज जगदाळेंच्या पाठिंब्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना फायदा होऊ शकतो.
शरद पवार यांनी आज इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ दौरा केला. या दौऱ्यात पवारांनी हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा, असं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर नाराज असलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.