Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २५ वर्षीय IT पदवीधर तरुणीला एटीएस आणि उल्हासनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर एक व्हॉटसॲप संदेश आला. या संदेशात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास त्यांना जीवे मारण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे आदित्यनाथ यांची हत्या करू, असे संदेशात नमूद करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ राज्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या संदेशाची गंभीर दखल घेतली.
वरळी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. मोबाइल क्रमांक आणि इतर तांत्रिक पुराव्यांवरून पोलिस उल्हासनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीपर्यंत पोहोचले. चौकशीत ही तरुणी मानसिक रग्ण असल्याचे समजले. पोलिसांनी या तरुणीला नोटीस जारी केली आहे. वैद्यकीय तपासणी अहवालानंतर या तरुणीवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या संदेशानंतर मुंबई दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि उल्हासनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने पोलीस सतर्क आहेत.