Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असून, त्यानंतर राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीही अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत.
बंडोबांना थंड करण्यासाठी ऐन दिवाळीत सर्व पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या भेटीगाठींचे फलितही आज ठरेल. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सहा मुख्य राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्याही जास्त होती. पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघांत इच्छुकांनी बंड केले, तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले. अशा उमेदवारीमुळे मतदारसंघाचा निकाल बदलू शकत असल्याने हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे. मुंबईतील माहिम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, शिवसेनेने (उबाठा) महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना त्यांनी त्यास साफ नकार देत लढण्याचे ठरवले आहे. ठाकरे, सरवणकर, सावंत अशी तिहेरी लढत माहिममध्ये झाल्यास विजयाचे पारडे कुणाकडे झुकेल हे सांगता येणे अवघड आहे. त्यामुळे सोमवारी सरवणकर अर्ज मागे घेणार की, तिहेरी लढत पक्की करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोरिवली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्याविरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. शेट्टी यांना पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही शेट्टी यांनी अर्ज मागे घेणार की नाही, हे स्पष्ट केले नव्हते.
शेट्टी यांनी निवडणूक लढवली तर त्याचा थेट फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी शेट्टी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांच्याविरोधात महायुतीतील शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे भाजप मलिक यांचा प्रचार करण्यास नकार देत असताना दुसरीकडे शिवसेना मराठी उमेदवार उभा करून मतदारसंघातील मराठी मतांची रसद तोडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पाटील अर्ज मागे घेणार नसल्याचे बोलत असून, मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी, नवाब मलिक आणि सुरेश पाटील अशी तिहेरी लढत होऊ शकते. मुलुंड मतदारसंघात भाजपच्या मिहीर कोटेचा यांच्याविरोधात
‘आता मला प्रसन्न करा’
बारामती : लोकसभा निवडणुकीत ‘साहेबां’ना खूश केले. आता या विधानसभा निवडणुकीत मला प्रसन्न करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मतदारांना केले. अजित पवार हे रविवारी सावळ या गावी प्रचारात बोलत होते. ‘सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या असत्या तर साहेबांना या वयात कसे वाटले असते, हा विचार करून तुम्ही त्यांना मते दिलीत. आता विधानसभा निवडणुकीत मला मत द्या. साहेब आपल्या पद्धतीने काम करतील. मी माझ्या पद्धतीने काम करेन,’ असे अजित पवार म्हणाले. बारामतीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नियम बाजूला ठेऊन काम केल्याचा दावाही त्यांनी अन्य एका गावातील दौऱ्यात केला. विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शप) त्यांचे पुतणे युगेंद्र पवार लढत आहेत.
आजपासून प्रचारधडाका
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर वाढणार आहे. दिवाळी सुट्टी संपल्यानंतर आणि सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरचा दिवस असल्याने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सभा आणि बैठकांचा नारळ सोमवारी फुटणार असून आता स्टार प्रचारकही प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
‘मी युतीचा नव्हे, राष्ट्रवादीचा’
मुंबई : ‘मी महायुतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे,’ असे वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी केले. ‘मला अपेक्षित होते तेच महायुतीतील काही जण बोलत आहेत. त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नेते माझ्यासोबत नाहीत, मात्र जनता माझ्यासोबत आहे,’ असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) संगिता वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, काँग्रेसने राकेश शेट्टी यांना एबी फॉर्म दिला आहे. एकीकडे कोटेचा यांना २०१९च्या निवडणुकीत भरघोस आघाडी मिळालेली असताना दुसरीकडे विरोधकांचे दोन उमेदवार रिंगणात राहिले तर कोटेचा यांना ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहसीन हैदर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. रविवारी हैदर यांनी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांना भेटून अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने जाधव यांचा जीव भांड्यात पडला आहे. नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात दोन इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महायुतीने या मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांना संधी दिली, तर मविआकडून राष्ट्रवादी-शप पक्षाच्या संदीप नाईक यांना तिकीट दिले आहे.
महायुतीतील इच्छुक उमेदवार विजय नाहटा यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून मविआतील राष्ट्रवादी-शप पक्षातील इच्छुक डॉ. मंगेश आमले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ऐरोली मतदारसंघातही तसेच चित्र असून महायुतीकडून भाजपच्या गणेश नाईक यांना पुन्हा संधी दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. चौगुले हे निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचा दावा करत असले तरी सोमवारी ते कोणता निर्णय घेतात, यावर ऐरोलीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होते की चौगुले यांच्या उमेदवारीची त्यात भर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उर्वरित राज्यात जवळपास ५० हून अधिक ठिकाणी नेत्यांनी केलेल्या बंडखोरीने महायुती आणि मविआमधील नेते जेरीस आले आहेत.
ऐन दिवाळीत नेत्यांशी संपर्क साधण्याचा तर महत्त्वाच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेत मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीतला यांचीही दिवाळी मनधरणीत गेली. अद्यापही बहुतांश ठिकाणी बंडखोर आपल्या भूमिकेवर अडून राहिल्याने मनधरणीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठका दौरे सुरू आहेत. अर्ज छाननीनंतर फडणवीसांनी मुंबईत बैठका घेतल्यानंतर नागपूर गाठले. तिथे नाराज इच्छुकांची समजूत काढल्यानंतर फडणवीसांनी पुणे गाठत पक्षातील नाराजांची समजूत काढली. पुण्यात विविध नेत्यांच्या गाठीभेटीनंतर फडणवीस यांनी मुंबई गाठली.
मुंबईत पक्षातील नेत्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. जवळपास तीन तास चाललेल्या या भेटीत बंडखोरीवर मार्ग काढण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे, शरद पवारांनी इंदापूर तालुक्याचा दौरा केला. राष्ट्रवादी- शप पक्षाने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने इंदापूरचे भरत शहा कुटुंबीय नाराज आहेत. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना विरोध दर्शविला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार हे शहा कुटुंबियांच्या घरी पोहचले. अर्ध्या तासाच्या या भेटीचा तपशील मात्र जाहीर करण्यात आला नाही. दुसरीकडे अप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात प्रचार करण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्याही चिंतेत भर पडली आहे. मविआमध्येही बंडखोरी शमविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवसेना (उबाठा) आणि शेतकरी पक्षातील जागांवरून तणाव आहे. यावर, संजय राऊत यांनी शेकापसोबत चर्चेची तयारी दर्शविली. सांगोला वगळता अलिबाग, पेण आणि पनवेल या जागांबाबत चर्चा होऊ शकते, असा नवा प्रस्ताव राऊतांनी दिला. सांगोल्यात शिवसेनेचा आमदार विजयी झाला होता त्यामुळे ही जागा आमचीच आहे. मात्र, अलिबाग, पेण आणि पनवेलच्या जागेबाबत शेकापसोबत चर्चा केली जाईल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे दिलीप मानेंना पक्षाचा एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाचीच असल्याचा दावा राऊतांनी केला.
मित्रपक्ष आमनेसामने
मतदार संघ पक्ष
भिवंडी पूर्व समाजवादी पक्ष, शिवसेना (उबाठा)
कल्याण पूर्व शिवसेना (उबाठा), काँग्रेस
पालघर काँग्रेस, शिवसेना (उबाठा)
श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस
परांडा शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शप, समाजवादी पक्ष
सोलापूर दक्षिण काँग्रेस, शिवसेना (उबाठा)
अहेरी राष्ट्रवादी शप, काँग्रेस
अक्कलकुवा भाजप, शिवसेना
अकोला पूर्व शिवसेना (उबाठा), काँग्रेस
आंबेगाव शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शप
आमगाव राष्ट्रवादी शप, काँग्रेस
औरंगाबाद पूर्व शेकाप, काँग्रेस
औसा रिपाई, भाजप
बदनापूर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी शप, शिवसेना उबाठा
बडनेरा रिपाई आठवले, भाजप वसमत काँग्रेस, राष्ट्रवादी (शप)