Omraje Nimbalkar on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या गोष्टी उद्धव ठाकरे यांना कळाव्यात, म्हणून आमदार कैलास पाटील शिंदेंसोबत गेले होते, असा दावाही निंबाळकरांनी केला.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देव धानोरा या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्या मूळ गावी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, त्यावेळी आयोजित सभेत ओमराजे बोलत होते. ओमराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसह भाजपवरही निशाणा साधला. इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही.
“एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचा एक माणूस जेव्ही ईडीने ताब्यात घेतला, तिकडून त्यांना भाजपवाले कोण दाब देत होते, ते नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला. टरबूज का खरबूज बघा तुमचं काय ते… कसं करतोस? येतोस आमच्यासोबत पक्ष फोडून की जातोस जेलात… ते म्हणाले मुख्यमंत्री झालेलं काय वाईट आहे तिथे जेलात पालथं पडण्यापेक्षा.. गेले तिकडे पक्ष घेऊन सगळं” असं खासदार ओमराजे म्हणाले.
अजित पवार यांच्यावरही टीका
“तेवढं होतंय ना होतंय तोच… भाईओ और बहनों, सत्तर हजार करोड का घोटाला किसने किया? ते अजित पवार सातव्या दिवशी कोणाच्या मंत्रिमंडळात? कुणाच्या? भाजपच्या!” असंही ओमराजे निंबाळकर पुढे म्हणाले.
ओमराजे निंबाळकर कोण आहेत?
ओमराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे गटातर्फे लोकसभेवर निवडून गेले आहेत. यापूर्वी २००९ ते २०१४ मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. तर २०१९ पासून सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत. शिवसेनेतील बंडावेळी ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते.