New Interim Maharashtra dgp Vivek Phansalkar : राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवलं गेलं आहे. त्यानंतर आता राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून विवेक फणसाळकर यांची निवड केली गेली आहे. पोलिसांचे नवीन बॉस विवेक फणसाळकर नेमके कोण आहेत जाणून घ्या.
कोण आहेत विवेक फणसाळकर?
विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. तर २०१६-१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते. पुण्याचे असलेल्या फणसळकर यांची अकोला येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती ‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये दक्षता विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. नाशिक पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी वर्धा आणि परभणीत अधिक्षक पद भूषविले. विवेक फणसळकरांना मुंबईची आणि मुंबई पोलिस दलाची चांगल्या प्रकारे माहिती आहे. मुंबई पोलिस दलात प्रशासन विभाग आणि मुंबईच्या वाहतूक कोंडीची समस्या हाताळणाऱ्या वाहतूक शाखेचे सहआयुक्त म्हणून त्यांनी भरीव काम केले. शांत स्वभाव पण तितकेच शिस्तप्रिय आणि इंग्रजीवर प्रभुत्व ही फणसळकर यांची वैशिष्ट्ये आहेत.
रश्मी शुक्ला यांना का हटवलं?
निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवत राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नवीन महालसंचालक नेमण्याचे आदेश राज्याच्या सचिवांना दिले. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचाकपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाकडून वारंवार करण्यात येत होती. यामध्ये सर्वात जास्त काँग्रेसनच्या नेत्यांनी रश्मी शुक्लांविरोधात टीका करत त्यांच्या बदलीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. रश्मी शुक्ला यांना हटवल्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पटोलेंनी पुरावे सादर करावेत अशी मागणी केली आहे.