Goregaon Vidha Sabha : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला गोरेगाव मतदारसंघ हा पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेला मालाडच्या खाडीपर्यंत व उत्तरेकडे कांदिवलीच्या सीमेपर्यंत आहे. या मतदारसंघाचा काही भाग गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला, तर बहुतांश भाग पश्चिमेला आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला गोरेगाव मतदारसंघ हा पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेला मालाडच्या खाडीपर्यंत व उत्तरेकडे कांदिवलीच्या सीमेपर्यंत आहे. या मतदारसंघाचा काही भाग गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला, तर बहुतांश भाग पश्चिमेला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे १९८५च्या निवडणुकीत येथून जनता दलाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर १९९०पासून या मतदारसंघावर भाजप-शिवसेना युतीचाच ताबा आहे. १९९० ते २००९दरम्यान शिवसेनेचे उमदेवार येथून मोठ्या फरकाने जिंकले. त्यात तीन वेळा ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१४पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्या निवडणुकीत भाजपच्या विद्या ठाकूर यांनी सुभाष देसाई यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा सुमारे ४,८०० मतांच्या (तीन टक्के) फरकाने पराभव करीत मतदारसंघ ताब्यात घेतला. या मोठ्या विजयामुळे भाजपने पहिल्याच कार्यकाळात त्यांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ घातली. पुढे २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने १७.५२ टक्के मते घेऊनही विद्या ठाकूर यांनी ३२ टक्क्यांचे मताधिक्य घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
आता यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे आहे. शिवसेना पक्षात फूट पडली, त्यावेळी गोरेगावातील शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून गोरेगावमधून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभा निवडणूक २०१९चे तिकीट दिले. त्यात त्यांचा ४८ मतांनी निसटता पराभव झाला. महायुतीच्या (शिवसेना) उमेदवाराने येथून अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध तब्बल ३३ टक्क्यांचे (२३ हजारांहून अधिक मते) मताधिक्य मिळविले. निवडणूक महायुतीअंतर्गत असल्याने या मताधिक्यात भाजपचा वाटा मोलाचा होता, असे स्थानिक सांगतात.
आता विधानसभेला महाविकास आघाडीने येथून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ नेते समीर देसाई यांना रिंगणात उतरविले आहे. समीर देसाई हे गोरेगावातील जुने नाव आहे. त्यांचा मतदारसंघात संपर्क दांडगा आहे. मात्र या मतदारसंघात आघाडीतील अन्य पक्षांचे प्राबल्य फार नाही. त्या तुलनेत महायुतीत भाजप व शिवसेना, या दोन्ही पक्षांचा जोर आहे. या स्थितीत लोकसभा निवडणुकीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराची असलेली पीछाडी लक्षात ठेवत सर्व पातळ्यांवर समीर देसाई यांना ही निवडणूक लढायची आहे. अशा प्रकारे भाजपचा हा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान देसाई यांच्यासमोर असेल.
वाहतूककोंडी कोंडला श्वास
उच्चभ्रू वस्ती असली, तरीही पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीचा त्रास येथे आहे. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेला भाग अरुंद रस्त्यांचा आहे. तसेच त्या भागातील जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न येथे आहे. पश्चिमेकडील लोअर ओशिवरा ते मालाड खाडीला लागून असलेल्या भागाचा काही ठिकाणी विकास रखडलेला आहे.
एकूण मतदार – ३,२७,६११
पुरुष – १,७७,०९८
महिला – १.५०,५००
तृतीयपंथी – १३