Sada Sarvankar: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असताना माहीमचा तिढा कायम आहे. शिंदेसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.
सदा सरवणकर यांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर आता ते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. ते राज यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना माहीममधील मतांचं समीकरण सांगितलं. ‘मी अर्ज मागे घेतला तर अमित ठाकरे तिथे निवडून येऊ शकणार नाहीत, असं तिथलं समीकरण आहे. तेच मी राज ठाकरेंना सांगणार आहे. काही विशिष्ट जातीधर्माची लोक मनसेला मतदान करतील अशी स्थिती नाही. काही समाजांमध्ये मनसेबद्दल राग आणि चीड आहे. ती मतदानातून दिसेल आणि अमित ठाकरेंचा पराभव होईल. मी उभा राहिलो तर काही अंशी ते निवडून येण्याची शक्यता वाढते,’ असं सरवणकर म्हणाले.
राज ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनीदेखील मतांच्या समीकरणांचा अभ्यास केला असेल. पण मी तळागाळात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. मी विभागप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केलं आहे. प्रत्येक गटात, प्रत्येक मतदारयादीत आणि पालिकेच्या प्रत्येक प्रभागात किती मतदान आहे, ते कोणत्या बाजूचं आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यावरुनच मी सांगतोय की मी उभा राहिलो तर अमित ठाकरेंना फायदा होईल, असं समीकरण सरवणकर यांनी सांगितलं.
काही मतदारसंघांमध्ये मनसेच्या उमेदवारांमुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे राज यांनी त्यांचे उमेदवार मागे घ्यावेत. मग आम्ही माहीममधून माघार घेऊ, अशी भूमिका सरवणकर यांनी मांडली. ‘शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी महायुतीचे अधिकाधिक आमदार निवडून यावे लागतील. मनसेनं काही ठिकाणी उमेदवार दिलेत. त्यामुळे काही ठिकाणी महायुतीचे काही आमदार पराभूत होऊ शकतात. त्याचा परिणाम महायुतीच्या संख्याबळावर होऊ शकतो. मुंबईत अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत. त्यांच्यामुळे महायुतीची संख्या कमी होऊ शकते,’ असं सरवणकर म्हणाले.