Eknath Shinde And Sharad Pawar: नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या संपर्कात असून निकालानंतर काहीही होऊ शकतं, असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदे शरद पवारांच्या संपर्कात, मलिकांचा मोठा दावा
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा पक्ष बदलू शकतात. महायुतीतीलच घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने हे विधान केल्याने सध्या त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा सुरु आहे.
एका मुलाखतीदरम्यान नवाब मलिक यांनी दावा केला की, निवडणुकीनंतर भाजपचं सरकार पुन्हा स्थापन होणार की नाही, अजित पवार महायुतीत राहणार की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते, असं ते म्हणाले.
अणुशक्ती नगरमधून उमेदवारी मिळावी म्हणून ते अजित पवारांसोबत आल्याचं त्यांनी उघडपणे कबूल केले. मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकतं हे मला माहीत आहे. मी महाविकास आघाडीत आलो असतो तर मला अणुशक्ती नगरमधून उमेदवारी मिळाली नसती.
माझ्या अटकेनंतरही महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा स्वीकारला नाही, हे खरे असले तरी अजितने मला वैयक्तिकरित्या खूप मदत केली आहे, असंही ते म्हणाले. मला तिकीट दिल्याने त्यांच्यावर टीका होईल, याची जाणीव होती, तरीही त्यांनी मला उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात.