sharad Pawar on Rashmi Shukla Transfer : राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानंतर विवेक फणसाळकर यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली. रश्मी शुक्ला यांच्या पदलीच्या निर्णयावर बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
माझ्या मते राज्य सरकारला थोबाडीत दिली आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपला आहे आणि त्यांच्याबद्दल सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात, अशा व्यक्तिला एक्स्टेंशन देऊन त्यांच्या कालखंडामध्ये ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नयेत, असं म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचे गंभीर आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना यासंदर्भात त्यांची चौकशीही सुरू होती. मात्र सत्तांतर झाल्यावर काही दिवसातच त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरून अनेकवेळा थेट रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली होती. आता गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सत्ताधारी उमेदवारांना पोलिसांच्या गाडीमधून रसद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्याविरोधात आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, रश्मी शुक्ला यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची नियुक्ती केली गेली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी तीन नावांची चर्चा होती. यामध्ये विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा आणि संजीव कुमार सिंघल डी.जी. पी (अँटी करप्शन ब्युरो) अशी तीन नावे होती.