Maharashtra Election 2024: राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, मात्र मुख्यमंत्री कोण होईल हे सांगता येणार नाही. जर महायुतीत काही वाद झाले तर मुख्यमंत्रीपदासाठी आपण तयार आहोत असे रामदास आठवले म्हणाले.
नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे या राज ठाकरे यांच्या मताशी आपण सहमत आहोत. महायुतीमध्ये निकालानंतर कोणताही वाद होणार नाही. यासाठी केंद्रीय नेते आणि आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर महायुतीत काही वाद झाले तर मुख्यमंत्रीपदासाठी मी तयार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये राज ठाकरे याचा मनसे नाही. त्यांनी काही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. विधानसभेसाठी भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टॅडिंग असल्याचा मोठा गौप्यस्फोट आठवले यांनी यावेळी केला. मनसेमुळे महायुतीला फायदा होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. आरपीआयच्या मतांचा महायुतीला फायदा झाला आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणातील विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही राज्यातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय असून आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास आताच्या दीड हजार रुपयात वाढ करू. आम्ही ज्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या सर्वांची अंमलबजावणी सरकार आल्यावर होईल असे आठवले म्हणाले.
जरांगेच्या भूमिकेचे स्वागत…
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालणार नाही. महायुती सरकार मराठा समाजाच्या मागे असून मराठा समाजातील गरीबांना आरक्षण दिले पाहिजे. मात्र हे आरक्षण ओबीसीमधून देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
बंडखोरी करू नका…
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला ४ ते ५ जागा मिळायला हव्या होत्या. मात्र आम्हाला एकच जागा मिळाली. असे असले तरी कार्यकर्त्यांनी बंडखोरी करू नये कारण आपल्याकडे केंद्रीय मंत्री, महामंडळ असे पदे आहेत, असे देखील आठवले म्हणाले.