Tarachand Mhaske In Sharad Pawar Group : अजितदादांना शिर्डीत मोठा धक्का बसला असून, पाडव्याच्या मुहूर्तावर ताराचंद म्हस्के यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ मधून निवृत्त झाल्यावर ताराचंद म्हस्के पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन सक्रिय राजकारणात उडी घेतली. त्यांनी एकूण ३७ वर्षे पत्रकारिता केली. आपल्या सडेतोड लिखणीतून त्यांनी शेतकरी, पाणीप्रश्न, ग्रामीण भागातील प्रश्न, राजकारण यावर भरपूर लिखाण केलं. निर्भीड पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची राज्याला ओळख आहे. लोकसभा, विधानसभा या सार्वत्रिक निवडणुकीत निकालाआधीच त्यांनी वर्तवलेले अंदाज अनेकवेळा तंतोतंत जुळले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना पक्षाने ताराचंद म्हस्के पाटील यांना पक्षात सामील करून त्यांच्यावर ‘ प्रदेश प्रवक्ते’ या पदाची जबादारी सोपावली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर म्हस्के यांनी अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार यांच्याशी दीर्घाकाळापासून घनिष्ठ संबंध राहिल्याने ताराचंद म्हस्के पाटील हे अजित पवार यांच्या पक्षात फारसे रमले नाहीत. त्यांनी शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा पुन्हा निर्णय घेतला.
दिवाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हस्के पाटील यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. नगर जिल्ह्यातील राजकारणावरही चर्चा झाली. उद्या दिवाळी पाडव्याला पुन्हा या आणि तुमचा पक्षात प्रवेश करून टाकू अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्या. त्यानुसार दिवाळी पाडाव्याच्या मुहूर्तावर बारामती येथील गोविंद बागेत ताराचंद म्हस्के पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते प्रवेश संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, नगरचे खासदार निलेश लंके, नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, आ. रोहीत पवार, योगेंद्र पवार, श्रीनिवास बापू पवार आणि इतर स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.
स्वगृही परातल्याचे मोठे समाधान…
फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधी-नेहरू यांचे विचार मांडणारे आणि सातत्याने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता यांचे हित जोपसणारे शरद पवार साहेब या महानेत्याचा मोठा प्रभाव माझ्यावर दीर्घकाळापासून आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारापासून दूर जाऊ शकत नव्हतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने मध्यंतरी पक्ष फुटीनंतर काही काळ मी अजितदादांसोबत काम करण्याचा निर्णय केला.
धडाडीचे नेतृत्व, प्रशासनावर प्रचंड पकड, विकास कामांसाठी सतत आग्रही असणारे अजित पवार यांना भाजपने सोबत घेऊन त्यांची आणि त्यांच्या पक्षाची मोठी कोंडी चालवली. त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यामुळेच मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षासाठी सक्रिय यापुढे निष्ठेने काम करत राहील, अशी प्रतिक्रिया ताराचंद म्हस्के पाटील यांनी दिली.
म्हस्के पाटील यांच्या अनुभवाचा फायदाच… – राष्ट्रवादी काँग्रेस
ताराचंद म्हस्के पाटील यांना पत्रकारिता क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव असून राजकीय विश्लेषक असल्याने सार्वत्रिक निवडूक निकालासंबंधी त्यांनी आजवर दिलेले अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होत राहील. पक्षात त्यांना योग्य सन्मान मिळेल. त्यांचे पक्षात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रियाताई सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिली आहे.
Tarachand Mhaske : अजितदादांना शिर्डीत मोठा धक्का; बड्या पदाधिकाऱ्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांनी जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक यांना दिवाळी पाडव्याच्या दिवशी पक्षात सामील करून घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे, निलेश लंके, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रोहीत पवार, नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, दौंड माजी आमदार रमेश आप्पा थोरात ,भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, योगेंद्र पवार, श्रीनिवास बापू पवार हे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.