Kopri Pachpakhadi Manoj Shinde : कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघात काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे केदार दिघे यांची डोकेदुखी वाढली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले मनोज शिंदे ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी याआधी या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात २००९ साली निवडणूक लढवली होती. ३२ हजार ७७६ मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत शिंदे यांना ७३ हजार ५०२ आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या राजन गावंड यांना ३५ हजार ९१४ मते मिळाली होती.
मुख्यत्वे काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असलेली ही जागा यंदा मविआच्या जागा वाटपात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळाली. याठिकाणी केदार दिघे यांना रिंगणात उतरले. त्यामुळे नाराज झालेल्या मनोज शिंदे यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सोमवारी देखील मनोज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, लोकसभेतील ‘सांगली पॅटर्न’ मी येथे राबवणार, असे शिंदे यांनी उमेदवारी अर्जाबाबत सांगितले. दरम्यान, शिंदे यांच्यावर कारवाईचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे याप्रश्नी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष अँड. विक्रांत चव्हाण यांनी नमूद केले.
काँग्रेसचे निष्ठावान आमच्यासोबत : केदार दिघे
मनोज शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आमच्या शुभेच्छा आहेत. मविआच्या जागा वाटपात ही जागा आम्हाला मिळाली. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आमच्यासोबत काम करतील, अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली.
Thane News : कोपरी – पाचपाखाडीत ठाकरे गटाची डोकेदुखी कायम, केदार दिघेंविरोधातील बंडखोरी शमवण्यात अपयश
दरम्यान, राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या १४७ कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केदार दिघे यांच्या सामन्याकडे पाहिले जाते. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यातच ही दुरंगी लढत रंगणार आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले असून दोन्ही शिवसेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.