kolhapur North Vidhan Sabha Nivadnuk: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांनी यांनी माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. या संपूर्ण घटनेवर बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना अश्रूअनावर झाले.
दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आमदार सतेज पाटील हे कार्यकर्त्यांना भेटले. मधुरिमाराजे यांनी अर्ज माघारी घेतल्या अजिंक्यतारा कार्यालयात बोलताना सतेज पाटील म्हणाले, छत्रपतींनी असा निर्णय का घेतला याबद्दल आपल्याला खरच काही माहिती नाही. त्यांच्या काय अडचणी होत्या हे देखील माहिती नाही. यासंदर्भात ते कधीच बोलले नाही. अगदी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याआधी त्यांनी मला हे कळवले. माझ्या पोरा बाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीच माहित नाही असे सांगत सतेज पाटलांना अश्रूअनावर झाले.
सतेज पाटलांनी घडलेले सगळं सांगितले…
जे काही घडले ते तुमच्या समोर आहे. आज मी त्यावर आज काही बोलणार नाही. जे काही घडले त्याला सामोरे जायचे सामर्थ्य तुम्ही मला द्यायचे आहे. पद, प्रतिष्ठा आणि पैसा यापेक्षा तुमच्यासारखी जीवाभावाची लोक हीच माझी ताकत आहे. मला दोन वाजून ३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला. त्यांनी सांगितले आम्ही माघार घेणार आहोत. मी त्यांना सांगितले की, असा निर्णय घेऊ नका. फक्त पाच तासात आपण एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही तसा निर्णय घेऊ नका. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला काही झाले तरी त्याची जबाबदारी माजी असेल, असे मी त्यांनी सांगितले.
त्यानंतर मी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. त्यापुढे काय झाले ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आहे. येथील परिस्थिती माझ्या हातात नव्हती. त्यांचा हात धरून थांबवणे हे मला संयुक्तीक वाटत नव्हते. तेथे माझ्याकडून काही आणखी काही वाक्य जाऊ नये म्हणून मला दोघां तिघांनी गाडीत बसून जाण्यास सांगितले. पाच तारखेला मिरजकर तिकटी येथे प्रचाराचा शुभारंभ होणार होता. त्याची चर्चा झाली होती. असे सर्व ठरले असताना असा निर्णय का घेतला गेला याचे उत्तर शपथ माझ्याकडे नाही. माझ्या पोरा बाळांची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे याचे उत्तर नाही, असे सांगत पाटलांना अश्रूअनावर झाले.
का घडले, काय घडले याची मला कल्पना नाही. का त्यांच्या डोक्यात विचार आला, याबद्दल मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी त्यांच्याबद्दल काही चुकीचे बोलणार नाही. त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो आता माघारी घेता येणार नाही. आता जे समोर आले आहे त्याला तुम्ही म्हटला तर सामोरे जायचे आहे. आज मला एक दिवस द्या. मी उद्या आपण एकत्र येऊन काय करायचे कसे करायचे याचा निर्णय घेऊ, असे सतेज पाटील म्हणाले.