Maval Vidhan Sabha Sunil Shelke: मावळ विधानसभा मतदारसंघाची सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा आहे. यातच आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मतदारासंघात महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
नाना काटे यांची आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. चर्चेनंतर काटेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण त्यांनी मावळमध्ये सुनील शेळके यांच्यासाठी जोर लावणार असल्याची पुष्टी दिली आहे.
नाना काटेंशी फोनवरून चर्चा करताना फडणवीस म्हणाले की, जे सोडून गेलेत ते काही परत येणार नाही. त्यांची वैयक्तिक दुश्मनी आहे. आम्ही संपूर्ण भाजप त्यांच्या मागे उभी करत आहोत, मी स्वतः जातोय. सुनीलला माहितीये मी किती प्रयत्न केले. पण आदल्या दिवशी बावनकुळे साहेबांनी चार तास मध्यस्थी केली. पण ते काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. आम्ही स्वतः सुनील शेळकेंच्या मागे पूर्ण ताकद उभी करतो आहोत, असे फडणवीसांनी नाना काटेंना आश्वासन दिले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून सुनील शेळके यांना मावळच्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी विरोध दर्शवत राष्ट्रवादीतून बंडखोरी करून अपक्ष उभ्या असलेल्या बापू भेगडे यांना पाठिंबा दिला. तेव्हापासून मावळचे राजकारण एका वेगळ्या वळणावर गेले आहे. मात्र, आता थेट देवेंद्र फडणवीसच सुनील शेळकेंसाठी मावळच्या मैदानात उतरत असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.