Ratnagiri Vidhan Sabha Uday Bane: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटातील शिलेदार उदय बने यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे. यासोबतच त्यांनी पक्षाचे काम थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांची मंगळवारी सात नोव्हेंबरला रत्नागिरी येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्याआधीच शिवसेनेचा मंत्री असलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या मोठ्या कार्यकर्त्याने पक्षाचे काम थांबवण्याचे निश्चित केले आहे. उदय बनेंनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपला निर्णय जाहीर करताना उदय बने म्हणाले, आपण निवडणुकीसाठी कधीही इच्छुक नव्हतो. मात्र अवघ्या कार्यकारिणीने माझ्या नावाची शिफारस केली म्हणून मी तयार झालो. पण उद्धवजींनी मला सांगितलं की माझ्यापर्यंत ही शिफारस आलेली नाही. त्यांनी विनायक राऊत यांनाही विचारलं ही शिफारस माझ्याकडे का नाही आली, अशी ही मार्मिक टिप्पणीही बनेंनी केली. पण आता बास्स झालं मी अडीच वर्षे वाट पाहिली, आता मी दमलो आहे. माझं ऑपरेशन झालं त्यातूनही मी उभा राहिलो आणि पक्षाचं काम करत होतो मात्र आता मी थांबणार आहे.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे मानणारा मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबरोबर काम केलेला मी शिवसैनिक आहे, अशीही बोलकी प्रतिक्रिया बनेंनी दिली आहे.
ठाकरे गटाचे निष्ठावन समजले जाणारे ज्येष्ठ शिवसैनिक उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत आपण एक निषेध म्हणून हा उमेदवारी अर्ज भरला होता. आपण तब्बल ४५ वर्षे काम केल्यानंतर आता पक्षाचं काम थांबण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या नावाची शिफारस अख्या कार्यकारिणीने केली होती हे शिफारस पत्रच त्यांनी माध्यमांसमोर दाखवत आज उघड केले आहे.
दोन उदय एकत्र आले तर…
शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, दोन उदय एकत्र आले तर आम्ही अधिक चांगल्या जोमाने काम करू शकतो. यावर बोलताना उदय बने म्हणाले की, मी त्यांच्याही भूमिकेचे स्वागत करतो. आता जो कोणी चांगलं काम करेल त्याला माझा पाठिंबा असेल. मला आता माझ्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मला समाजकारण करायचं आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून समाजकारण हे माझे ध्येय आहे.
‘आता मला पक्ष कोणती जबाबदारी देणार नाही. मी गेली अडीच वर्षे वाट पाहिली आणि आता पक्षाने संधी दिली तरी मी काम करणारही नाही. मी आता दमलो आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया उदय यांनी दिली आहे. रत्नागिरी येथील विविध जिल्हा परिषद गटातून तब्बल पाच वेळा निवडून आलेले व तब्बल तीन वेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले व विविध समित्यांचे सभापती म्हणून काम केलेले उदय बने यांनी पक्षाचे काम थांबवण्याचा मोठा निर्णय घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.