Raj Thackeray Campaign Rally at Thane: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातून प्रचाराचा शंख फुंकला आहे. सभेत बोलताना राज ठाकरेंनी गत ५ वर्षांतील राजकारणावरुन सर्वच पक्षातील नेत्यांना घेरले आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरुन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मनसे स्टाईल मध्ये टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांवरच पलटवार केला आहे. ‘राज ठाकरे म्हणाले, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही ना त्या एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ना त्या उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे.’ असे ठासून सांगितल्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादीच्या अजित पवारांनाही लक्ष्य केले आहे. म्हणाले, ‘तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचंय करा, शरद पवारांसोबत माझे कितीही मतभेद असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवारांचंच अपत्य आहे, ते अजित पवाराचं अपत्य नाही.’
यासोबतच ‘उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांचा फोटो असायचा पण हिंदूह्रदयसम्राट हे नाव नसायचं. दरम्यान मी काही उर्दू होर्डिंग्जही पाहिले, ज्यावर उर्दू भाषेत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या अगोदर जनाब लिहिलेले असायचे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर टीका केली आहे.
मुंबईतील कुर्ल्यात पार पडलेल्या शिवसेनेच्या सभेतील नर्तकीच्या व्हिडीओ क्लीपवरुन राज ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. ‘काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. त्या सभेतील एक क्लिप मी पाहिली. व्यासपीठावर शिंदेंचा फोटो, त्यांच्या उमेदवारांचं नाव आणि मंचावर एक तरुणी भोजपुरी गाण्यावर नाचतेय. हीच का तुमची लाडकी बहीण योजना?’ अशा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.