शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हामुळे फटका बसला. आता विरोधक रणनीती म्हणून अनेक मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट चिन्ह देऊन मतदारांचा गोंधळ उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. नगर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात हे चिन्ह अपक्षांना मिळाले असून, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतांचे विभाजन रोखण्यासाठी पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे ते मिळवण्यासाठीही अपक्ष उमेदवारांमध्ये चढाओढ होती. त्यामुळे नियमानुसार ज्याने ते प्रथम मागितले, त्याला ते देण्यात आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित राजेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारीवाला माणूस या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. तर त्याच मतदारसंघात रोहित चंद्रकांत पवार हे उमेदवार ट्रम्पेट चिन्हावर लढत आहेत. राहुरीत प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात मात्र कोणीही ट्रम्पेट चिन्ह घेतलेले नाही. तर काही ठिकाणी जेथे पवारांचे उमेदवार नाहीत, अशा ठिकाही ट्रम्पेट चिन्ह अपक्षांनी घेतली आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत- जामखेड रोहित चंद्रकांत पवार, नगर शहर- प्रतिक बारसे, कोपरगाव – शिवाजी पोपटराव कवडे, संगमनेर- भरत संभाजी भोसले, शिर्डी- मयुर मुर्तडक, अकोले – पांडुरंग पथवे, नेवासा- शरद बाबूराव माघाडे, शेवगाव-पाथर्डी : राजेंद्र रंगनाथ ढाकणे, श्रीरामपूर- सूर्यकांत विश्वनाथ आंबडकर, पारनेर- सखाराम मालू सरक व श्रीगोंदा- विनोद साळवे हे अपक्ष उमेदवार ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी ही मतदारांचा गोंधळ उडून आपली मते या चिन्हावर जाऊ नयेत, यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आताच टेन्शन आले आहे. अर्थात लोकसभा निवडुकीनंतर या विषयावर बऱ्यापैकी जागृती झाली आहे. असे असले तरी पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मिळणाऱ्या एकूम मतांच्या टक्केवारीवर याचा परिणाम होणार आहे.