Kolhapur North Assembly: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघारी घेतल्याने आता काँग्रेस पक्षाने अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. लाटकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी त्याला विरोध केला होता. शहर काँग्रेस कार्यालयावर दगडफेकीचे प्रकार देखील घडले होते. त्यामुळे काँग्रेसने येथून उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. पक्षाने मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल देखील केला.मात्र दुसऱ्या बाजूला राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवसापर्यंत लाटकरांनी अर्ज मागे न घेतल्याने मतदारसंघात त्यांचे आव्हान कायम होते.
अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. जिल्हाधिकारी कार्यालायत खासदार शाहू महाराजसह मधुरिमाराजे यांनी माघार घेत असल्याचा अर्ज दिला. या माघारीनंतर काँग्रेसकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा राजेश लाटकरांना पाठिंबा असल्याचे सांगितले. काँग्रेसचा लाटकरांना पाठिंबा असेल आणि त्यांना विजय करू, असे नाना म्हणाले.
मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी नाइलाजाने मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याचे सांगितले. काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश लाटकर यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यांनी माघार न घेतल्याने आम्ही निवडणुकीतून माघार घेत असल्याचे शाहू महाराजांनी सांगितले.
मालोजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया
मधुरिमाराजे यांच्या माघारीवर त्यांचे पती आणि माजी आमदार मालोजीराजे यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिक्रिया दिली. आज आपली मानसिक बरोबर नाही. मी सर्व नागरिकांशी आणि मतदारांशी नंतर सविस्तर बोलेन आणि भूमिका मांडेन असे त्यांनी सांगितले. दरम्यान या सर्व घडामोडीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आक्रमक झाल्याचे दिसले. आपल्याला तोंडघशी पाडले. जर दम नव्हता तर उभे रहायचे नव्हते. मी देखील माझी ताकद दाखवली असती असे म्हणत सतेज पाटील बाहेर पडले.
एकूणच कोल्हापूर उत्तरमध्ये जागा कोणाला मिळणार यावरून सुरू झालेला राडा आता निकालापर्यंत कामय राहण्याची चिन्हे आहे. तसेच या घडामोडींचे परिणाम भविष्यातील राजकारणावर होण्याची शक्यता आहे.