Nandurbar Balasaheb Thorat : नंदुरबारमध्ये सर्व बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांना बंडखोरांचं बंड शमवण्यात यश आलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सुटल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत उमेदवार तसंच नेत्यांवर विविध आरोप केले होते. त्यासोबत नंदुरबार आणि शहादा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. अवघ्या काही महिन्यांआधी झालेल्या लोकसभेत महाआघाडी एकसंघ दिसत असताना विधानसभेचा तोंडावर वेगवेगळे गट पडले होते.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात दुपारी साडेबाराच्या दरम्यान हेलिकॉप्टरने नंदुरबार शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी साक्री येथील महाआघाडीतील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर शहादा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या घराकडे मोर्चा वळाला. तिथे त्यांनी सुहास नाईक यांच्याशी चर्चा केली. तसंच नंदुरबार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर शहादा मतदारसंघातून काँग्रेसचे सुहास नाईक यांनी, तर नंदुरबार येथून विश्वनाथ वळवी यांनी अर्ज माघार घेतला.
Nandurbar News : बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने नंदुरबार शहरात, दोन तासात महाआघाडीच्या बंडखोरांचे अर्ज मागे
दरम्यान, शहादा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोहन शेवाळे यांनी अर्ज माघार घेतला. नंदुरबार तसंच अक्कलकुवा विधानसभेसाठी उबाठाकडून महिला जिल्हाध्यक्ष रीना पाडवी यांनी उमेदवारी दाखल केला होता, त्यांनीही उमेदवारी मागे घेतली. जिल्ह्यातील तीन ठिकाणी विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या दोन तासाच्या दौऱ्यात सर्व बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. बाळासाहेब थोरात यांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडी एकसंघ दिसत असल्याचं चित्र आहे. बंडखोरांना समजवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी हेलिकॉप्टरने येत बंड थंड केलं. याची जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.