Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि.४) शेवटचा दिवस होता. महायुती आणि मविआच्या नेत्यांपुढे बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान होते. विशेषत: नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळातील सर्वाधिक बंडखोर रिंगणात होते.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि.४) शेवटचा दिवस होता. महायुती आणि मविआच्या नेत्यांपुढे बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान होते. विशेषत: नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळातील सर्वाधिक बंडखोर रिंगणात होते. महायुतीकडून या बंडोबांना शांत करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे दोन दिवस तळ ठोकून होते.
‘नाशिक मध्य’त दहा उमेदवार
मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार देवयानी फरांदेंसमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रंजन ठाकरेंनी अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. शिवसेना उबाठाचे उमेदवार वसंत गितेंसमोर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्यासह तिघांनी अर्ज दाखल केले होते. डॉ. पाटील यांच्या उमेदवारीने गितेंसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्य ते राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. डॉ. पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी दुपारी अडीच वाजेपर्यंत करण्यात आलेले प्रयत्न सफल ठरले. डॉ. पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे येथे आता महायुतीच्या प्रा. देवयानी फरांदे विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंत गिते यांच्यात मुख्य लढत होईल. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने खरे तर तिरंगी लढत दिसून येईल. मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये आता एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत.
नाशिक पूर्वमध्ये १३ उमेदवार रिंगणात
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे ॲड. राहुल ढिकले, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्यात लढत रंगणार आहे. या ठिकाणी जरांगे समर्थक भाऊसाहेब निमसे व नीलेश मगर या दोघांनी माघार घेतल्याने, तसेच मनसेचे प्रसाद सानप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने तेरा उमेदवार मैदानात आहेत.
पश्चिममध्ये हिरे-बडगुजर-पाटील यांच्यात लढत
पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी पहायला मिळाली. दिलीप भामरे, शशिकांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे भाजपमधील बंडखोरी टळली असून, सीमा हिरे यांच्यासमोरील पक्षांतर्गत निर्माण झालेले आव्हान संपुष्टात आले. परंतु, भाजपच्याच दिनकर पाटील यांनी मनसेतून उमेदवारी केल्याने मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारे माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे.
देवळालीत माघारीचे नाट्यमाघारीच्या दिवशी देवळालीत अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. शिवसेना उबाठाकडून या ठिकाणी योगेश घोलप रिंगणात आहेत. परंतु, महायुतीत मात्र या ठिकाणी बंडखोरी झाल्याने आमदार सरोज अहिरे यांच्यासह योगेश घोलप यांच्यासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. नांदगाव मतदारसंघातील समीर भुजबळ यांच्या भूमिकेमुळे देवळालीत अजित पवार गटाच्या आहिरे यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने डॉ. राजश्री अहिरराव यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. परंतु, माघारीच्या दिवशी त्यांनी माघार न घेतल्याने येथे ट्विस्ट निर्माण झाले आहे. येथे महायुतीतील फूट तर दिसलीच, त्याशिवाय महाविकास आघाडीसमोर देखील आव्हान निर्माण झाले आहे. त्या व्यतिरिक्त मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसपाकडून देखील उमेदवारी कायम राहिल्याने बहुरंगी लढत रंगणार आहे.