Sada Sarvankar on Raj Thackeray : एकनाथ शिंदे यांची शिवसेना माहीमची जागा सोडण्यास तयार होती, सरवणकरांची भेट राज ठाकरेंनी नाकारल्यामुळे निर्णयात खोडा पडला.
दहा जागाही ठरल्या
सदा सरवणकर यांनी माहीमची जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मनसेला त्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार दहा जागांवर शिवसेनेविरुद्धचे उमेदवार मनसे माघारी घेणार होती. शिवसेनेचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मान्यही केला होता. दहा जागा निश्चितही झाल्या होत्या. शिवतीर्थावर निरोप पोहोचला, जागांची नावं ठरली, राज ठाकरेही तयार झाले.
वेळ निघून गेली…
अनेक दिवसांच्या मनधरणीनंतर सरवणकर माघार घेण्यास तयार झाले होते. परंतु राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना भेट नाकारली. अशात शिवसेनेने आपला प्रस्ताव मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळही निघून गेल्याने आता संघर्ष अटळ आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघातून यावेळी पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरवणकर यांच्याशी संवाद साधत होते.
सोमवारी सकाळी सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते राज ठाकरे यांची भेट घ्यायला शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले, मात्र त्यांना भेटण्यास राज ठाकरे यांनी नकार दिल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटे बाकी असताना सरवणकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा तसेच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.