Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची छुपी युती झाल्याची चर्चा आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंची गेल्या काही दिवसांमधील विधानं, त्यांनी दिलेले आणि न दिलेले उमेदवार यावर शंका उपस्थित केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची काल शेवटची तारीख होती. त्यानंतर राज्यभरातील लढतींचं चित्र स्पष्ट झालं. मुंबईतील ३६ जागांपैकी २५ जागांवर मनसेनं उमेदवार दिले आहेत. महायुतीत यापैकी १० जागा भाजप, तर १२ जागा शिंदेसेना लढवत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांना, त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी जवळीक असलेल्या नेत्यांविरोधात मनसेनं उमेदवार दिलेले नाहीत.
भाजप आमदार राहुल नार्वेकर (कुलाबा), मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), विनोद शेलार (मालाड पश्चिम), मिहीर कोटेचा (मुलुंड), तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा) यांच्याविरोधात मनसेनं उमेदवार दिलेले नाहीत. या नेत्यांना राज ठाकरेंकडून एकप्रकारे बाय देण्यात आलेला आहे. हे नेते फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.
दुसरीकडे राज ठाकरेंनी शिंदेसेना लढवत असलेल्या जवळपास सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मिलिंद देवरा (वरळी), सदा सरवणकर (माहीम), मंगेश कुडाळकर (कुर्ला), तुकाराम काटे (अणुशक्तीनगर), दिलीप लांडे (चांदिवली), संजय निरुपम (दिंडोशी), मनिषा वायकर (जोगेश्वरी पूर्व), अशोक पाटील (भांडूप), सुवर्णा करंजे (विक्रोळी), प्रकाश सुर्वे (मागाठाणे) यांच्याविरोधात राज यांनी उमेदवार दिले आहेत.
शिंदेसेनेकडून मुंबादेवीची जागा लढवत असलेल्या शायना एनसी आणि अंधेरी पूर्वची जागा लढवत असलेले मुरजी पटेल यांच्याविरुद्ध मात्र राज यांनी उमेदवार दिलेला नाही. विशेष म्हणजे या दोघांनी भाजपमधून शिंदेसेनेत निवडणूक लढवण्यासाठी प्रवेश केलेला आहे. ते मूळचे भाजपचेच आहेत. ते शिंदेंचे निष्ठावंत नाहीत. त्यामुळेच राज यांनी त्यांच्याविरोधात उमेदवार दिले नसावेत अशी चर्चा आहे.
Raj Thackeray: भाजपला बाय न् शिंदेंची कोंडी; राज ठाकरेंनी फिल्डींग लावली; किती जागांवर छुप्या युतीची चर्चा?
महायुतीचं सरकार पुन्हा येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं विधान राज यांनी गेल्याच आठवड्यात एका मुलाखतीत केलं. याच मुलाखतीत त्यांनी मला मिळालेलं निवडणूक चिन्ह कोर्टानं दिलेलं नाही. ते मतदारांमुळे मला मिळालंय. मी ते ढापलेलं नाही, असं म्हटलं. काल डोंबिवलीतल्या भाषणातही त्यांनी पक्ष, चिन्हावरुन मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला. पण त्यांनी भाजपवर टीका करणं टाळलं. त्यामुळे मनसे, भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.