Maharashtra Election 2024: उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरात केपी पाटील यांच्यासाठीच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी ५ मोठी आश्वासने दिली.
उद्धव ठाकरे यांनी या पहिल्याच सभेत ५ मोठी आश्वासने दिली. राज्यातील सर्व मुलांना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाईल असे ठाकरे म्हणाले. सध्या राज्यात सर्व मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईले असे ते म्हणाले. मुली आणि मुले हे दोघेही कुटुंबाचे आधरस्तंभ असतात, असे ही ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी दिलेले दुसरे मोठे आश्वासन म्हणजे राज्यात महाविकास सरकार सत्तेवर आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. यात कनिष्ठ ते वरिष्ठ पदांचा समावेश असेल. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना तक्रार कशी आणि कुठे करायची हे माहिती नसते. त्यासाठीच राज्यात महिला पोलिसांची भरती करताना स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातील सभेत उद्धव ठाकरे यांनी दिलेले सर्वात मोठे आश्वासन म्हणजे धारावी आणि मुंबई परिसरात भूमिपुत्रांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्याचे होय. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईतील अदानींना दिलेले प्रकल्प रद्द करू आणि धारावीतील उद्योगांना घरे देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दिले. राज्यात आमचे सरकार असते तर शेतकरी कर्जमुक्त झाला असता, असे ही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी यावेळी डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षासाठी न बदलणार नाहीत असे आश्वासन दिले. मविआचे सरकार आल्यास जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवेल असे ठाकरे म्हणाले.